Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

डबाबंद खाद्यसंस्कृती

$
0
0

डॉ. अविनाश भोंडवे

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये ताजी फळं आणि भाज्या विकत आणणं आणि खाणं सर्वांना शक्य होतंच असं नाही. अशावेळी गोठवलेल्या किंवा डबाबंद भाज्यांचा आणि फळांचा एक पर्याय समोर येतो. तो कितपत चांगला की वाईट?

'उत्तम आरोग्यासाठी ताजी फळं आणि ताज्या भाज्या रोज खाव्या,' असा आरोग्यशास्त्राचा दंडक माहिती असूनही, आज बहुसंख्य कुटुंबांना त्यांच्या जीवनशैलीमुळे हे शक्य होत नाही. सकाळी आठ वाजता कामाला बाहेर पडायचं आणि संध्याकाळी उशीरा घरी पोहचायचं, हा शिरस्ता असल्यानं रोजच्या रोज ताज्या भाज्या आणि फळं मंडईतून किंवा भाजीवाल्याकडून आणणं अशक्यच असतं. ही नोकरदार मंडळी सोडा; पण दहा ते पाच काम करणाऱ्यांना आणि गृहिणींनासुद्धा हा बाजार रोजच्या रोज करणं त्यांच्या इतर कामाच्या व्यापात क्वचितच जमतं.

त्यात भर म्हणून 'ताजी' या नावाखाली विकली जाणारी भाजी, पाण्याचे हबके मारून कशी ताजी ठेवली जाते, हे तर आपण सर्रास पाहतो. शिवाय रासायनिक खतं, कीटकनाशकांचे फवारे, कृत्रिम रंग मारलेल्या भाज्या, कुठल्या कुठल्या

रासायनिक रंगांनी पिकवलेली आणि रंगवलेली आंबा, केळी, सफरचंदासारखी फळं भरमसाठ किमतीला मिळतात. अशा गोष्टींनी आरोग्य चांगलं राहील की बिघडेल, ही भीती मनात असलेल्या गृहिणी ती विकत घ्यायचं आता टाळू लागल्या आहेत.

परिणामतः आजच्या बदलत्या आरोग्यशैलीमध्ये भाज्या आणि फळं खाल्ली जातात; पण ती फ्रोझन आणि कॅनड स्वरूपातील. मॉलमध्ये आणि अनेक किराणा दुकानातही मिळणाऱ्या गोठवलेल्या भाज्या, वाळवलेली कडधान्यं, फ्रोझन वाटाणा, घेवडा, बाराही महिने मिळणारी डबाबंद फळं आणि फळांचे काप नियमित घेण्याकडे आज सर्वांचा कल वाढलेला नजरेत भरतो. साहजिकच ताज्या भाज्या आणि फळांच्या तुलनेत, या नव्या खाद्यसंस्कृतीचे फायदे-तोटे पाहणं गरजेचं आहे.

भाज्या आणि फळांचे फायदे

बहुतेक सर्व भाज्यांत आणि फळांत स्निग्ध घटक, कोलेस्टेरॉल आणि पर्यायानं ऊर्जा कमी असते. त्यात सोडियमसारखे क्षारही खूप अल्प आढळतात. त्यामुळे वजनवाढ, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह टाळण्यासाठी त्यांचा वापर उपयुक्त ठरतो.

भाज्यांच्या आणि फळांच्या तंतुमय रचनेनं मुबलक फायबर मिळतात. त्यामुळे हृदयविकार टाळण्यासाठी ते आदर्श अन्नपदार्थ म्हणून मानले जातात. त्यांच्या नियमित सेवनानं बद्धकोष्ठाचा धोका टळतो आणि पोट व्यवस्थित साफ होतं. फळं आणि भाज्यांतील फायबर पोटात गेल्यावर आपल्या पोटाची पोकळी ते व्यापतात, त्यामुळे कमीत कमी कॅलरीज जाऊनही पोट भरल्याचं समाधान मिळतं.

फळं आणि भाज्या आपल्याला 'क' जीवनसत्व आणि फोलिक अॅसिड भरपूर प्रमाणात देतात. 'क' जीवनसत्व शरीरातील पेशींच्या आणि उतींच्या वाढीसाठी आवश्यक असतं, तसंच हिरड्या मजबूत व्हायलाही उपयोगी असतं. फोलिक अॅसिडमुळे लाल रक्तपेशींची आणि हिमोग्लोबिनची वाढ होते. गर्भवती स्त्रीला ते नियमित आणि योग्य प्रमाणात मिळालं, तर तिच्या पोटातील गर्भाची वाढ चांगली होते आणि गर्भामध्ये निर्माण होणाऱ्या कित्येक विकृती टळतात.

फ्रोझन आणि डबाबंद पदार्थांचे फायदे-तोटे

फ्रोझन आणि डबाबंद फळं व भाज्यांचा मुख्य फायदा म्हणजे, त्या आरोग्यदृष्ट्या निर्जंतुक असतात. त्यांच्यातील पोषणमूल्य कायम राखलेलं असतं आणि मुख्य म्हणजे बाराही महिने त्या हवे तेव्हा मिळतात. नैसर्गिक भाज्या, फळं त्या त्या हंगामातच आपल्याला लाभतात. शिवाय आपल्याला मिळण्यापूर्वी किमान दोन तीन दिवस आधी तोडलेली किंवा कापलेली असतात. एकदा ती छाटली गेली, की त्यांना मिळणारं नैसर्गिक पाणी बंद होतं. त्यात हवेतल्या उष्णतेनं होणाऱ्या बाष्पीभवनामुळे त्यांच्यातील बीटा कॅरोटिनसदृश सत्वं नष्ट होत जातात. शिवाय घरी आणून त्या लगेच न खाता फ्रीजमध्ये काही दिवस ठेवल्या गेल्यानं ही सत्वं आणखीन कमी होतात. फ्रोझन पदार्थांत ती ताज्या स्वरूपात गोठवली जात असल्यानं त्यांचे आरोग्यमूल्यही टिकवलं जातं.

एवढी गोष्ट सोडली तर या फ्रोझन आणि डबाबंद पदार्थांचे तोटे बरेच आहेत. अन्न प्रक्रियेत हे पदार्थ अगोदर गरम पाण्यात धुतले जातात. त्यामध्ये त्यांच्यातील 'क' आणि 'ब' जीवनसत्वं नष्ट होतात. फळांच्या डबाबंद प्रक्रियेत त्यांच्या साली काढल्या जातात, त्यामुळे त्यांच्यातील 'फायबर'चं प्रमाण खूप कमी होतं. ते सेवन करणाऱ्यांना साहजिकच त्यामुळे होणाऱ्या फायद्यांना मुकावं लागतं.

या पदार्थांमध्ये मोनो-सोडियम ग्लुटामेट, सोडियम टार्टरेट असे क्षार मिसळले जातात. त्यामुळे नैसर्गिक पदार्थांपेक्षा क्षार जास्त असतात. डबाबंद पदार्थ साखरेच्या पाकात टिकवले जातात; त्यामुळे त्यांच्यातील साखरेचं आणि ऊर्जेचं प्रमाण खूप वाढतं. साहजिकच वजनवाढ, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांना ती बाधक ठरतात. साध्या द्रवपदार्थात किंवा त्याच फळाच्या रसात भिजवलेले फळांचे काप कमी बाधक ठरतात.

सुदैवानं आपल्या देशात अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला भरपूर पिकतो. शिवाय अजूनही फारच थोडी फळं आणि भाज्या अशी प्रक्रियाकृत पद्धतीनं उपलब्ध आहेत. त्यामुळे बदलत्या आरोग्यशैलीत ताजी फळं आणि भाज्या रोज मिळाल्या नाही, तरी जेव्हा शक्य असेल तेव्हा मिळवून खाव्या. त्याच बरोबर फ्रोझन, डबाबंद पदार्थ पूर्णतः त्याज्य न ठरवता अधून मधून त्यांचाही सोय म्हणून वापर नक्की करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>