Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

गोडावर ठेवा नियंत्रण

$
0
0

जेवणानंतर गोड खाण्याची सवय तुम्हालाही आहे? मग ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. अति प्रमाणात गोड खाण्याची सवय सोडण्याच्या विचारात असाल तर नक्की वाचा...

००००

मुंबई टाइम्स टीम

सतत गोडधोड खाणाऱ्यांसाठी लॉकडाऊनचा हा काळ अधिकच कठीण आहे. मिठाईची दुकानं बंद असल्यानं काही जणांना अस्वस्थता जाणवत असल्याचं पाहायला मिळतंय. तर काही जण घरी वेगवेगळे गोड पदार्थ बनवून त्यावर ताव मारत आहेत. घरी गोड पदार्थ बनवताना मुद्दाम जास्त प्रमाणात बनवले जातात. जेणेकरुन पुढचे दोन-तीन दिवस त्याचा आस्वाद घेता येईल. पण जास्त प्रमाणात गोड खाणं आरोग्याच्या दृष्टीनं हानीकारक असतं. त्यामुळे तुम्हाला ही सवय सोडायची असेल तर हाच काळ योग्य आहे. तज्ज्ञांच्या मते, गोड पदार्थ खाण्याची सवय कमी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

गोड पदार्थ मिळाले नाही तर काही मंडळी अस्वस्थ होतात. काहींना गोड पदार्थ खायला मिळाले नाहीत तर जेवण झाल्यासारखं वाटतच नाही. काही लोक तर मिठाई दिसताच त्यावर ताव मारतात आणि कितीही गोड खाल्लं तरीही त्यांचं मन भरत नाही. ही सवय दूर करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. तसंच सध्या लॉकडाऊनमुळे घरी असल्यामुळे ही गोडाची सवय कमी करणं सहज शक्य आहे. एक लक्षात ठेवा की, कोणतीही सवय तत्काळ सुटत नाही, त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे लगेच एका दिवसात अति गोड खाण्याची सवय पूर्णपणे सुटणं शक्य नाही. हळूहळू एकेक पाऊल पुढे जा. तसंच तुमच्या सवयीचं निरीक्षण करा. म्हणजे कधी गोड खायची प्रकर्षानं इच्छा होते, किती प्रमाणात गोड पदार्थ खाता यावर लक्ष ठेवा, असं तज्ज्ञ सांगतात.

सवयीचं करायचं काय?

जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा अनेकांना होते. पण तुम्हाला गोड खाल्लं नाही तर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नसेल आणि नेहमीच जेवणानंतर गोड पदार्थ हवाच असेल तर याचा अर्थ तुम्हाला त्याची सवय लागली आहे असं समजावं. पण ज्यांना गोड पदार्थाची आठवण येत नाही आणि खाल्ले नाही तर काही फरक पडत नाही अशांना गोडाची सवय नसते. ही सवय कमी करण्यासाठी फळं खाण्यावर भर देऊ शकतो.

सवय का असते?

आतड्यांमधील चांगल्या आणि वाईट जीवाणूंचं संतुलन नसल्यास गोड पदार्थ खावेसे वाटतात. जास्त तेलकट, मसालेदार, जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे सहसा ही परिस्थिती उद्भवते. त्यामुळे आतड्याची क्रिया सुरळीत पार पडत नाही. परिणामी, अन्नाचं पचन योग्यरितीनं होत नाही. सध्या लॉकडाऊनमध्ये ही सवय सोडणं सहज शक्य आहे. कारण इतर वेळी पुरेसा वेळ हातात नसतो. यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून रिकाम्यापोटी प्यायल्यास १० दिवसातच फरक दिसू लागेल. यामुळे आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढू लागेल आणि पचनक्रिया सुरळीत होईल. गोडाची सवय सोडण्यासाठी शरीराला लिंबू सरबत पिऊन डिटॉक्सिफाय करणंदेखील आवश्यक आहे.

सवय सोडणं का गरजेचं?

सद्यस्थितीत डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ प्रत्येक व्यक्तीला मीठ व गोड पदार्थ अति प्रमाणात खाण्याची सवय सोडण्याच्या सूचना देत आहेत. कारण लठ्ठपणा, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

- अनेकांना जेवणानंतर मिठाई न मिळाल्यास कामात लक्ष लागत नाही.

- रात्री जेवणानंतर गोड खायला मिळालं नाही तर झोप नीट लागत नाही.

स्वत:वर ठेवा नियंत्रण

सध्या आपल्या हातात पुरेसा वेळ आहे. त्यामुळे कोणतीही सवय सोडणं, हे इतर दिवसांपेक्षा जास्त सोपं आहे. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वस्तू उपलब्ध नाहीत आणि घरातून बाहेर पडणं शक्य नाहीय. बाहेर पडलंच तर मिठाईची दुकानं बंद आहेत. त्यामुळे पर्याय खूप कमी आहेत. म्हणूनच या लॉकडाऊनच्या काळात फक्त गोडाच्याच नव्हे तर इतर वाईट सवयीही सोडणं सहज शक्य आहे. घरातच गोड पदार्थ बनवून खाल्ले तर? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर घरी गोड पदार्थ बनवणं शक्य आहे, पण ते कठीण आहे हे लक्षात ठेवा.

गोडाची सवय सोडण्यासाठी...

० जेवणानंतर दात घासा

आपण जेव्हा काही खारट पदार्थ खातो तेव्हा गोड खायची तीव्र इच्छा होते. त्यामुळे जेवणानंतर दात घासणं, हा सर्वात चांगला उपाय आहे. यामुळे तोंडाची चवही बदलते आणि सोबतच दातदेखील स्वच्छ राहतात. तोंडाची चव बदलल्यामुळे गोड खायची इच्छा कमी होते. पण तोंडातील लाळ पचनक्रिया सुरळीत्या पार पाडण्यासाठी मदत करते, त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच दात घासू नका. थोड्या वेळानं दात घासा.

० झोपेचं गणित सांभाळा

जेवणानंतर गोड खायला न मिळाल्यानं झोप लागायला वेळ लागू शकतो. पण सध्या ते शक्य आहे. इतरवेळी रात्री झोप न लागल्यास दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. पण सध्या ऑफिसला जायचं नाहीय. तसंच एरवी प्रवसासाठी लागणारे एक-दोन तासदेखील आपल्या हातात आहेत. त्यामुळे रात्री झोप नाहीच लागली तरीही सकाळी झोपू शकता आणि उशिराही उठू शकता.

० ड्रायफ्रुट्स खाऊ शकता

गोड पदार्थांना पर्याय म्हणून मनुका आणि खजूर खाऊ शकता. दिवसात १०-१२ मनुका किंवा २-३ खजूर खाणंदेखील चांगलं असतं. एकवेळच्या जेवणानंतर ४-५ मनुके आणि एक खजूर पुरेसं आहे. हे ड्रायफ्रुट्स बरेच दिवस टिकतात, त्यामुळे जास्त प्रमाणात आणू शकता. तसंच त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे बिनधास्त खाऊ शकता. फक्त मर्यादीत प्रमाणात खा.

० फळं खा

गोडाची सवय सोडायची असेल तर फळांचा आधार घेऊ शकतात. द्राक्ष, पपई, सफरचंद, संत्री अशी हंगामी फळं खाण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. यामुळे गोड खायची इच्छा कमी होते. घरी फळं स्वच्छ धुऊन झाकून ठेवावी आणि जेव्हा गोड खायची इच्छा होईल तेव्हा गोड खाण्याऐवजी फळं खावीत. शक्यतो जेवणानंतर लगेचच फळं खाणं टाळावं. किमान दोन तासांचं अंतर असावं. ते शक्य नसल्यास निदान एक तासांनंतरच फळं खावी.

० बडीशेपचा पर्याय

जेवणानंतर गोड खायची इच्छा झाल्यास बडीशेप खाणं हा एक चांगला पर्याय आहे. बडीशेप थोडीशी गोड असते. पण त्याबरोबर खडी साखर खाणं टाळा.

संकलन- मीनाक्षी शिंदे, साठ्ये कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>