अगदी यंत्रवत झालंय का तुमचं आयुष्य? घर ते ऑफिस, ऑफिस ते घर... मग थांबा. ज्याप्रमाणे यंत्राला तेलपाण्याची गरज असते तशीच शरीरालाही दुरुस्तीची गरज आहे.
हल्ली आपण इतक्या घाईत असतो की कशाकशाला म्हणून वेळ नसतो. सगळेच एखाद्या मशिनसारखे किंबहुना मशिनच झालो आहोत. सकाळपासून रात्रीपर्यंत घर-काम करत, टार्गेट पूर्ण करण्यामागे लागलेलं मशीन! पण मशिनमध्ये आणि माणसामध्ये मोठा फरक असा आहे, की मशिनला माणसासारखं मन नाही.
मशिनला शारीरिक थकवा आला, तरी आपल्यासारखा मानसिक थकवा, तणाव त्याला जाणवत नाही. तसंच, मशीन खूप काम करून गरम झालं, की ते आपण थोडा वेळ तरी म्हणजे गार होईपर्यंत बंद तरी ठेवतो. मात्र, आपण कितीही थकलो तरी थोडा ब्रेक, विश्रांती घेतो का? मशिनला जसं वेळोवेळी तेलपाणी, दुरूस्ती, इंधनाची गरज भासते, तशीच ती आपल्यालाही असते. आपल्याला दर २-३ तासांनी थोडं-थोडं खाण्याचा सल्ला आपल्या आहारतज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी दिला असेल, तर आपण तो पाळतो का? दिवसातील रोज थोडा वेळ तरी व्यायामासाठी काढतो का? कित्येक जण ऑफिसच्या तणावामुळे एवढे थकलेले असतात, की घरी आल्यावर परत व्यायामासाठी घराबाहेर पडण्याचा विचारच करू शकत नाहीत. आपला स्टॅमिना कमी झाला आहे, अकाली म्हातारपण जाणवायला लागलं आहे हे लक्षात येऊनही त्यासाठी पावलं उचलायची शारीरिक तसंच मानसिक तयारीच होत नाही. आपल्याला शारीरिक आणि मानसिक थकवा आला आहे हे कसं ओळखावं; तर खालील गोष्टींना आपल्याला सामोरं जायला लागते आहे का, हे प्रत्येकाने तपासून बघावं:
रात्रभर झोपूनही सकाळी उत्साह वाटत नाही.
संध्याकाळी घरी आल्यावर काहीही करण्याची इच्छा होत नाही.
अगदी लहानसहान कामंसुद्धा आपल्यासाठी दुसऱ्यांनी करावी असं वाटतं. उदा. पिण्यासाठी पाणी आणून देणं, पंख्याचं बटन लावणं, बेल वाजल्यावर दार उघडणं इ.
संध्याकाळी घरी आल्यावर घरातील कोणाबरोबरही न बोलता शांत, काहीही न करता बसून राहावंसं वाटणं.
छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरी तसंच ऑफिसमध्ये चिडचिड होणं.
दिवसभर ऑफिसमध्ये काम करून, थकूनही रात्री शांत झोप न येणं.
कामाचा अकारण ताण येणं.
मुलांना, घरच्यांना दिवसभराच्या थकव्यामुळे इच्छा असूनही वेळ न देणं.
मुलांबरोबर खेळण्यासाठी, त्यांच्याबरोबर दंगा मस्ती करण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी शारीरिक ताकद न पुरणं.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आला दिवस आनंदाने काम करून हसत-खेळत जगण्याऐवजी पुढं रेटणं.
शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळे कित्येक गोष्टींना आपल्याला मुकावं लागतं. कित्येक गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. हल्ली आयटी इंडस्ट्रीमुळे किंवा एकंदरच औद्योगिकीकरणामुळे कित्येक जणांना भरपूर पगार आहेत. खर्च करण्याची क्षमताही वाढली आहे; पण आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही त्याचा आनंद घेता येत नसेल, तर आपलं नक्कीच काहीतरी चुकतं आहे. आठवड्यातील एखादा दिवस किंवा दिवसातील थोडा वेळ तरी आपण आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी देऊयात.
रोजच्या दिवसातील थोडा वेळ आपली शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी, व्यायामासाठी देऊयात.
दिवसभरात आपल्या शरीराला आवश्यक आहार आपण घेऊयात आणि रोजचा येणारा दिवस सर्वांबरोबर आनंदात उत्साहात जगूयात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट