परीक्षेचा काळ म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तणावाचा. पण हल्ली शिक्षकांना याचं जास्त टेन्शन येऊ लागलंय. कारण, पेपर सुरू असताना विद्यार्थ्यांना चक्कर येण्याच्या अनेक घटना समोर येतायत. जागरण, खाण्याचं बिघडलेलं वेळापत्रक, अभ्यासाचा ताण यामुळे विद्यार्थ्यांचं चक्रच बिघडलं आहे...
परीक्षेचं टेन्शन...रात्रभर जागून केलेला अभ्यास...त्यानंतर सकाळी दहा वाजता ऋषीकेश पेपरला पोहोचला...उत्तरपत्रिकेवर माहिती भरता-भरताच तो चक्कर येऊन बाकावर पडला. तीच गोष्ट प्रेरणाची. पेपरच्या ताणामुळे सकाळपासून काहीही न खाता ती डोंबिवलीहून दादरला पोहोचली. पेपर सुरू झाल्यावर काही वेळातच तिला भोवळ आली. कॉलेजांमध्ये सध्या परीक्षेचं वातावरण असून हे प्रकार घडताना दिसतायत. त्यामुळे शिक्षकांना याचं जास्त टेन्शन आलं आहे.
पेपरच्या वेळी विद्यार्थ्यांना चक्कर येण्याचे प्रकार या आधीही घडत होते. यंदा मात्र या प्रकारांत वाढ झाली आहे असं कॉलेजमधले शिक्षक सांगतात. अपूर्ण राहिलेली झोप, वाढत्या उकाड्याचा त्रास, खाण्याकडे झालेलं दुर्लक्ष, ऐन परीक्षेच्या अभ्यास करण्याच्या सवयीमुळे आलेलं टेन्शन अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना पेपरच्या वेळी चक्कर येते. यामुळे आपला पेपरचा महत्त्वाचा वेळ फुकट जातोय हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाहीय.
ऐन पेपरच्या वेळी झटपट अभ्यास करण्याच्या सवयीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो. पण पेपर नीट न लिहिला गेल्यास विद्यार्थ्याचं संपूर्ण वर्षच पणाला लागतं असं प्रोफेसर्स सांगतात. कॉलेज विद्यार्थ्यांची काळजी घेतंच, मात्र पालकांनीही मुलांच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावं, असं एका प्रोफेसरनी सांगितलं. अनेकदा विद्यार्थी आपल्याला चक्कर आल्याचं पालकांना सांगत नाहीत, त्यामुळे पालकांना घडलेल्या घटनेविषयी कल्पनाही नसते.
कॉलेजांनी घेतलेली काळजी
* अनेक कॉलेजांमध्ये पेपर सुरू असताना विद्यार्थ्यांना बसल्या जागी पाणी आणून दिलं जातं.
* विद्यार्थ्यांना चक्कर आल्यासारखं वाटत असल्यास शक्तीवर्धक पेय, साखरेचं पाणी देण्याची सोय अनेक कॉलेजांमध्ये करण्यात आली आहे.
* काही कॉलेजांनी विद्यार्थ्यांना कांदा जवळ ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
* गरज पडल्यास विद्यार्थांना लगेचच डॉक्टरकडे नेलं जातं.
* विद्यार्थी जास्तच आजारी असल्यास त्याची वेगळी बसण्याची सोय केली जाते
हे करा
* भरपूर पाणी प्या.
* जंक फूड शक्यतो टाळा.
* सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण वेळेवर घ्या.
* रात्रीच्या वेळी खूप चहा-कॉफी प्यायल्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते टाळावं.
*फळांचे रस पिण्यापेक्षा फळंच खा.
चहा-कॉफी टाळा, पाणी प्या
आज मुंबई आणि आसपासच्या भागात उन्हाळा खूप जास्त आहे. त्यामुळे मुलांनी भरपूर पाणी पिण्याची गरज आहे. दिवसातून किमान अडीच-तीन लिटर्स पाणी प्यायला हवं. आजकालचे विद्यार्थी दिवसातून जेमतेम ३-४ ग्लास पाणी पितात. त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतात. अभ्यास करताना झोप येईल म्हणून पुरेसं जेवत नाहीत. या सगळ्याचा परिणाम होऊन विद्यार्थ्यांना चक्कर येते. अनेकदा रात्री-अपरात्री झोप उडवण्यासाठी चहा-कॉफी प्यायली जाते. त्याने विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी कॉफी-चहा घेणं टाळलं पाहिजे.
डॉ.प्रेरणा बावडेकर,आहारतज्ज्ञ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट