Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

समारंभाला जोड फिटनेसची

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

एकत्र येण्यासाठी, कौटुंबिक भेटीगाठी आणि सण-समारंभ गरजेचे आहेतच. पण अशा कार्यक्रमांत फक्त खाण्याकडे लक्ष न देता थोडं फिटनेसकडेही लक्ष द्यायला हवं. त्यासाठी काही वेगळ्या पण सोप्या गोष्टी आपल्याला नक्कीच करून पाहता येतील. त्याबद्दलच...

किटी पार्टी, भिशी, वाढदिवस, लग्न, केळवण यांसारखे समारंभ हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. अशा काही ना काही कारणानं आपण एकमेकांना भेटत असतो. काही समारंभ मोठे असतात, तर काही दोन कुटुंबांपुरतेच मर्यादित असतात. अशा समारंभामुळे जुने मित्र मैत्रिणी, नातेवाईक आपल्याला भेटतात. मग विचारांची देवाण-घेवाण होते. सुख-दुःख वाटलं जातं. त्याचबरोबर जेवणाचा मुख्य कार्यक्रमही असतो. समारंभ हे आवश्यकच आहेत; पण काळानुरूप समारंभाच्या या संस्कृतीत फिटनेसच्या दृष्टीनं विचार केला गेला, तर आपण काही बदल करू शकतो का याचा विचार होणं आवश्यक आहे असं वाटतं. त्यासाठी काही गोष्टी सुचवाव्याशा वाटतात. वर्षानुवर्षं आपण काही रूढी-परंपरांचं तसंच्या तसं अनुकरण करत आलो आहोत. उदा. लग्न समारंभ, केळवण या कार्यक्रमांना पंचपक्वान्नाचं जेवण दिलं जातं. सामान्यतः नोकरी करणारे वर - वधू असतील, तर केळवण रात्री उशीरा ठेवलं जातं. त्यात आग्रह करून जेवण वाढलं जातं. बरं, हा आग्रह कधीच कोशिंबीर, भाजीचा नसतो, तर तो गोड पदार्थांचाच असतो. लग्नाची तयारी, ऑफिसच्या कामाचा ताण आणि त्यात हे अवेळी, पचायला जड जेवण याचा त्यांच्या तब्येतीवर नक्कीच परिणाम होतो हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे. केळवणात पचायला हलके पदार्थ आपण नक्कीच ठेवू शकतो आणि जेवणातील पदार्थांपेक्षा मनमोकळ्या गप्पा, जुन्या आठवणी यानं ही संध्याकाळ अविस्मरणीय करू शकतो. एरवी पाश्चात्त्य रुढींचं अनुकरणही आपण मोकळेपणाने करतो. उदा. लहान मुलांची 'वाढदिवसाची पार्टी' धूमधडाक्यात साजरी करतो. इथंही जेवणालाच महत्त्व असतं. वाढदिवसाच्या पार्टीत आजकाल जादूचे प्रयोग, पपेट शो ठेवण्याची पद्धत रूळली आहे. त्याच्या बरोबरीनं आपण पालकांचे आणि मुलांचे काही खेळ घेऊ शकतो ज्यामध्ये त्यांच्या शारीरिक व्यायामाला चालना मिळू शकेल. 'वाढदिवसाची पार्टी' ही बंद हॉलमध्ये न ठेवता एखाद्या बागेतही करू शकतो. मोकळ्या हवेतली अशी पार्टी मुलं नक्कीच एंजॉय करतील.किटी पार्टी किंवा भिशीमध्येही एखाद्या खेळाचं किंवा झुम्बा प्रकारच्या व्यायामाचं आयोजन करू शकतो. बऱ्याच वेळेला जुने मित्रमैत्रिणी भेटल्यानंतर सगळे एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जातात. तिथल्या गर्दीमुळे नीट गप्पाही मारता येत नाहीत. मग, हॉटेलमध्ये जाण्याआधी आपण एखाद्या टेकडीवर जाऊ शकतो. बॅडमिंटन, फुटबॉल असा एखादा खेळही खेळू शकतो.

थोडा विचार केला, तर वर सांगितल्याप्रमाणे तुम्हालाही अनेक वेगवेगळे खेळ, गोष्टी सुचतील. कदाचित काही लोक याप्रमाणे भेटतही असतील. आठवडाभर आपण कामासाठी धावपळ करत असतो. तेव्हा मनात कितीही इच्छा असली, तरी फिटनेससाठी आपल्याला वेळ काढता येतोच असं नाही आणि शनिवार- रविवार हे भेटी-गाठी, समारंभात जातात. समारंभ तर आपण टाळू शकत नाही; पण मग त्याची थोडी पद्धत आपण बदलू शकलो, तर आपल्याच फिटनेससाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. मोठ्या समारंभात हे कदाचित शक्य होणार नाही; पण छोट्या समारंभात आपण याचा विचार नक्कीच करू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>