Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

संध्याकाळी डाएट फसतंय?

$
0
0

अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ

दिवसभर कडक डाएट करणारे संध्याकाळी मात्र खूप भूक लागल्यावर वडापाववर ताव मारतात. संध्याकाळी नेमकं असं काय होतं, ज्यामुळे दिवसभर सांभाळलेल्या डाएटचा विचका होतो?

दिवसभर व्यवस्थित आहार घेतल्यानंतर संध्याकाळी काम संपल्यानंतर थोडंसं निवांत वाटायला लागतं आणि मग डाएटला सुट्टी द्यावीशी वाटते. ऑफिसजवळ सँडविच, वडापाव, किंवा घरी येऊन चिवडा, फरसाण अशा तेलकट, पदार्थांवर ताव मारला जातो. तो ही जरा जास्तच! संध्याकाळी लागणारी प्रचंड भूक कशी नियंत्रणाखाली ठेवावी, तेव्हा नेमकं काय खावं याची काळजी अनेकांना असते.

संध्याकाळीच आहार का फसतो?

आहारावरील नियंत्रण जाण्याचं कारण म्हणजे सकाळपासून गरजेपेक्षाही खूप कमी खाणं आणि नको तितकं नियंत्रण ठेवणं, उपाशी राहणं किंवा फक्त फळं, सूप यांवर राहाणं, नाहीतर कुठलेतरी प्रोटिनशेक घेऊन शरीरावर अत्याचार करणं. यामुळे संध्याकाळी खूप भूक लागू शकते.

दिवसभर आपण कामात मग्न असतो. त्यामुळे खाण्यापिण्याचे विचार मनात येत नाही; पण काम संपल्यावर अचानक हा ताण संपतो. दिवसभर डाएट सांभाळल्याबद्दल स्वतःचं थोडं कौतुक करावं असं वाटू लागतं. मग थोडंसं म्हणून भरपूर खाल्लं जातं.

काहीजणांकडे संध्याकाळचं खाणं हा आवडीचा आणि निवांत होण्याचा भाग असतो. दिवसभराच्या गप्पा आणि संध्याकाळचे कार्यक्रम गरम वाफाळता चहा आणि नाश्त्याच्या संगतीनं ठरवले जातात. यावेळीही खाण्यावर नियंत्रण राहणं थोडं अवघड होतं.

कधी-कधी ऑफिस संपल्यावर पार्टीचा बेत ठरतो. मग त्याचा मोह टाळता येत नाही.

यावर उपाय काय? कुठलंही क्रॅश डाएट करू नका आणि खूप भूक लागून खाण्यावर नियंत्रणच राहणार नाही, इथंवर स्वतःला उपाशी ठेवू नका. दर दोन तासांनी हलका, नियमित आणि पोषक आहार घेत राहा. पाणी भरपूर प्या. दुपारी जेवणात फक्त पोळी भाजी नको; कारण तेव्हा पोट भरतं; पण मग संध्याकाळी परत खूप भूक लागते. दुपारच्या जेवणात सॅलड, ताक, डाळी असं काहीतरी असू द्या. दुपारी चहाबरोबर काहीतरी हेल्दी पदार्थ खा. उदा. खाकरा, सोया नट्स, भाजलेला चिवडा, मखाणा, चिवडा इत्यादी. ज्यानं थोडं पोट भरेल आणि संध्याकाळच्या खाण्यावर नियंत्रण राहू शकेल. संध्याकाळी काय खायचं, हे आधीच ठरवा. मग ऐनवेळेस नको ते खाल्लं जाणार नाही.


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>