Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे विकार, युवावस्थेतही उद्भवू शकतात या समस्या

$
0
0

डॉ. अजय अंबाडे, नेत्ररोगतज्ज्ञ
हल्ली जीवनशैलीच्या विकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामध्ये मधुमेह विकार सर्वाधिक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मधुमेह शरीराच्या अन्य अवयवांवर जसा प्रभाव करतो तसाच प्रभाव डोळ्यांवरही करतो. पण त्यासंबंधी समाजात फारशी जागृती नाही. दीर्घकालीन मधुमेहाने ग्रस्त रुग्णांच्या डोळ्यांना विकार होण्याचा धोका सामान्य व्यक्तीहून अधिक असतो. डायबिटिक रेटिनोपॅथी, मेक्युलोपॅथी, कमी वयात मोतिबिंदू अथवा काचबिंदूसारख्या विकारांना मधुमेह कारणीभूत ठरू शकतो.

जेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण दीर्घकाल अनियंत्रित असतं तेव्हा रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतीवरील पेशींची हानी होते. किंबहुना त्या मृत पावतात. त्या रक्तवाहिन्यांमधून रक्त आणि प्लाजमा बाहेर झिरपू लागतो. तो डोळ्यांच्या पडद्यासमोर येण्याची शक्यता वाढते. यास ‘डायबिटीक रेटिनोपॅथी’ म्हणतात. साधारणपणे डायबिटिक रेटिनोपॅथीचे दोन स्तर(स्टेज) आहेत. पहिला म्हणजे प्राथमिक अवस्था. त्याला ‘प्रि-प्रॉलिफरेटीव्ह रेटिनोपॅथी’ असं म्हणतात. त्यामध्ये रेटिनाच्या छोट्या रक्तवाहिन्यांची हानी होते आणि रक्त व प्लाझमा डोळ्यांत पाझरायला लागतं. अशा वेळी रुग्णास कुठली लक्षणं आढळून येत नाहीत.

दुसरा स्तर म्हणजे ‘प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी’. रक्तवाहिन्यांच्या झालेल्या हानीमुळे आवश्यक घटकद्रव्यं डोळ्यांच्या पेशींपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे रेटिनाच्या आसपास नव्या रक्तवाहिन्या बनू लागतात. या नव्या रक्तवाहिन्या तुलनेनं कमकुवत असतात. त्यामुळे त्यांना क्षती पोहोचते आणि त्यातून रक्त निघू लागते. ते डोळ्यांच्या पडद्यासमोरील जेलीमध्ये जमा झाल्याने दृष्टीला हानी पोहोचते. शिवाय, या नवीन तयार झालेल्या रक्तवाहिन्यांमुळे अत्याधिक तणाव निर्माण होऊन ‘रेटिना डिटॅचमेंट’ म्हणजे डोळ्यांचा पडदा सरकण्यासारखी गुंतागूंत निर्माण होऊ शकते. शिवाय जेव्हा द्रव्य पाझरून ते रेटिनातील प्रतिमा निर्माण करणाऱ्या मॅक्युलासमोर येतात; तशा परिस्थितीत कायमचं अंधत्व येऊ शकतं.
(वयोमानानुसार होणारे मॅक्युलर डिजनरेशन, जाणून घ्या या डोळ्यांच्या आजाराची लक्षणे)
पहिल्या स्तरात डायबिटिक रेटिनोपॅथीची लक्षणं आढळून येत नाहीत. दुसऱ्या स्तरात त्याची लक्षणं आढळून येतात. डायबिटिक रेटिनोपॅथीचा उपचार करण्यासाठी डोळ्यांची संपूर्ण तपासणी आवश्यक आहे. तपासणीसाठी ‘इन्डायरेक्ट ऑप्थेलमोस्कोप’चा वापर करण्यात येतो. त्यात काही शंका आली तर फ्लोरिसिन एंजिओग्राफी करण्यात येते.

त्यामुळे रक्तवाहिन्या कुठून गळत आहेत, हे उमगतं. सोबत ओसीटी देखील केली जाते. त्यामुळे पडद्यावर कुठे सूज आहे, हे कळू शकतं. त्यावरील उपचार म्हणून वर्षातून आवश्यकता भासल्यास तीन-चार वेळा अँटी व्हीईजीएफ इंजेक्शन लावल्या जातात. रक्तवाहिन्यांमध्ये गळती असेल अथवा अतिरिक्त रक्तवाहिन्यांची निर्मिती झाली असेल तर लेजर उपचार करणं क्रमप्राप्त आहे. लेजर फोटोकॉग्युलेशनमध्ये एक शक्तीशाली लेजर-किरण प्रभावित भागावर पाडलं जातं. त्यामुळे तेथील रक्तवाहिन्यांची गळती थांबते. तसंच अतिरिक्त रक्तवाहिन्यांची निर्मितीला लगाम लागतो.
(मूत्रमार्गाचे विकार आणि सोनोग्राफी, जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती)
अनेकदा डायबिटिक रेटिनोपॅथी नियंत्रणाबाहेर गेली असते. अशा वेळी ‘माइक्रोसर्जिकल ऑपरेशन’ म्हणजे ‘वीट्रेक्टॉमी’ करावी लागते. त्यामध्ये डोळ्यांमध्ये जमा झालेलं रक्त हटवून पुन्हा दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. शिवाय, रेटिनल डिटॅचमेंट झाले असेल म्हणजे डोळ्यांचा पडदा सरकला असेल तर शस्त्रक्रिया करून त्या जागेवर आणल्या जातात. मोतिबिंदूसारखे विकार उतारवयात होत असले तरी मधुमेहाच्या रुग्णांमध्ये युवावस्थेमध्ये हे विकार उद्भवू शकतात.

शिवाय मधुमेहामुळे डोळ्यांचा पक्षाघात होऊ शकतो. त्यामुळे डोळे तिरळे होण्याचा धोका संभवतो. हे सगळं टाळण्यासाठी मधुमेहग्रस्त रुग्णांनी डोळ्यांची नियमित तपासणी केली पाहिजे. किमान वर्षातून एकदा तरी तपासणी करणं अत्यावश्यक आहे. ज्यांना उतारवयात मधुमेह आढळला आहे त्यांनी तर सहा महिन्यांतून एकदा डोळ्याची तपासणी करावी. रिस्क फॅक्टर जसं की, उच्च कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, उच्चरक्तदाब यांना नियंत्रणात ठेवणं. शिवाय धूम्रपान टाळणं, मद्यपान टाळणं, डॉक्टरांचा सल्ला व्यवस्थितपणे एकला तरी मधुमेहामुळे होणाऱ्या समस्यांवर मात करता येईल आणि दृष्टीचे संपूर्ण संरक्षण करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>