लॉकडाउनच्या काळात स्क्रीनटाइम वाढल्याचं अनेक सर्वेक्षणातून समोर आलं आहे. वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे किंवा मनोरंजनासाठी अनेकांनी विविध प्रकारच्या स्क्रीन्सना जवळ केलं आहे. वाढत्या स्क्रीनटाइमचा थेट परिणाम डोळ्यांवर होतो, हे विसरुन चालणार नाही. स्क्रीनच्या अति संपर्कात आल्यामुळे डोळ्यांच्या कोणकोणत्या समस्या उद्भवतात आणि कशी खबरदारी घेतली पाहिजे याविषयी डॉ. हर्षवर्धन घोरपडे यांनी माहिती दिली आहे. ०००० मुंबई टाइम्स टीम कम्प्युटर स्क्रीन्स दुधारी तलवारीसारख्या असतात. एकीकडे संगणक आपल्याला व्यवसाय ते मनोरंजनापार्यंत, आरोग्यविषयक सल्ल्यापासून ऑनलाइन कोर्सेसपर्यंत, स्टॉक्स आणि फायनान्सपासून ऑनलाइन शॉपिंगपर्यंत अशा विविध कामांसाठी मदत करतात. तर दुसरीकडे डोळ्यांवर परिणाम होत असतो. कम्प्युटर एकाच खोलीमध्ये ठेवून आपल्या कामकाजाच्या वेळेदरम्यान त्याचा उपयोग होण्यापर्यंत ठीक आहे. पण सध्या दिवसभर मोबाइल, टॅब्स, लॅपटॉप, ऑफिस स्क्रीन्स आणि घड्याळ अशा विविध स्वरूपातील स्क्रीन्सचा वापर केला जातो. अति वापरामुळे गंभीर परिणामांना सामोरं जावं लागत आहे. लॉकडाउनमुळे अनेक लोक घरातच आहेत, अनेक लोक घरातूनच काम करत आहेत, घरातून अभ्यास करत आहेत आणि किराणा मालाची खरेदी देखील ऑनलाइन करत आहेत. तसंच म्हणजेच इतर दिवसांपेक्षा चार तास अधिक स्क्रीन्सवर व्यतीत करत आहेत, त्यामुळे कम्प्युटर स्क्रीन्समुळे निर्माण होणाऱ्या डोळ्यांवरील ताणाचं प्रमाण वाढलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपणा सर्वांना सौम्य ते गंभीर या स्वरूपात असलेला 'कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम' (सीव्हीएस) बाबत माहीत असलं पाहिजे. यामध्ये डोळे लाल होणं, कोरडे होणं, डोळे दुखणं, डोकेदुखीसह थकवा येणं, झोप न येणं, डोळ्यांमध्ये वेदना होणं, खांदेदुखी, मानदुखी, जवळची आणि दूरची नजर धूसर होणं अशा लक्षणांचा समावेश आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. स्मरणशक्ती आणि तार्किक विचारावर परिणाम करणारे गेम्स खेळण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी मोबाइल फोन/ टॅबलेटचा उपयोग करणाऱ्या मुलांनी अधिक काळ स्क्रीन्सवर व्यतीत केल्यानं त्यांच्या दृष्टीवर मोठा परिणाम होतो (भिंगाचे चष्मे लागण्याची शक्यता). दीर्घकाळापर्यंत असंच सुरू राहिलं तर समस्या वाढत जाऊन गंभीर आजार होऊ शकतो. थकवा आल्यानं, सतत डोळे चोळल्यामुळे स्टाय आणि कॉन्जक्टिव्हीटीजसारखे डोळ्यांचे संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ न धुतल्यास हे संसर्ग दुसऱ्यांना देखील होऊ शकतात. काही लोकांमध्ये, विशेषत: डोळ्यांनी कमी दिसत असलेल्या (दृष्टी कमी झालेले) वृद्धांमध्ये सतत स्क्रीनजवळ राहिल्यामुळे अॅक्युट ग्लॉकोमाचा त्रास होऊ शकतो. या आजारामध्ये डोळ्यांना तीव्र वेदना होणं, डोळे लालसर होणं आणि धूसर दिसणं अशा लक्षणांचा समावेश आहे. यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकते आणि कदाचित हॉस्पिटलमध्ये भरती हेाऊन लेझर उपचार करण्याची गरज भासू शकते. पुरेशा प्रमाणात झोप न मिळाल्यामुळे आणि संगणक, मोबाइल, लॅपॅटॉप स्क्रीन्सच्या निळ्या रंगाच्या प्रकाशामुळे काही लोकांच्या डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स आणि सुरकुत्या दिसतात. निळ्या रंगाच्या प्रकाशामुळे झोपेवर परिणाम होण्यासोबत डोळ्यांना देखील त्या प्रकाशाचा त्रास होतो. या सर्व समस्यांपैकी डोळ्यांचा कोरडेपणा आणि चष्म्यावरील अवलंबता या दीर्घकाळापर्यंत स्क्रीनजवळ राहिल्यानं उदयास आलेल्या दोन सर्वात सामान्य समस्या आहेत. कोरडेपणामुळे आणि सतत डोळ्यांमधून येणाऱ्या पाण्यामुळे धूसर दिसण्यास सुरूवात होते. कॉन्टॅक्ट लेन्सेसमुळे कोरडेपणामध्ये अधिक वाढ हेाते. त्यामुळे कम्प्युटरचा वापर करणाऱ्या युजर्सना कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तरूणांचा चष्म्याचा नंबर सतत बदलत असतो. त्यामुळे अधूनमधून धूसर दिसते. म्हणून महत्त्वाच्या कामांमध्ये देखील स्क्रीनवर व्यतीत करण्यात येणारी वेळ कमी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. खबरदारी कशी घ्यावी? - अँटी-रिफ्लेक्टिव्ह चष्मे किंवा स्क्रीन्सचा वापर करा. - कम्प्युटर किंवा लॅपटॉपची स्क्रीन ४५ अंश कोनामध्ये ठेवा. - वारंवार डोळ्यांची उघडझाप करत राहा. - स्क्रीन वापरताना आणि वापरानंतर डोळ्यांना ओलावा देणाऱ्या आय ड्रॉप्सचा वापर करा. - ताज्या, हिरव्या, लाल व नारिंगी रंगाच्या पालेभाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा. - २०-२०-२० नियमाचं पालन करा, म्हणजेच डोळ्यांमधील पेशी आणि डोळ्यांच्या पृष्ठभागाला आराम देण्यासाठी प्रत्येक २० मिनिटांनी २० मीटर अंतरापर्यंत २० सेकंदांपर्यंत पाहा. - थेट एसीसमोर बसू नका. - दररोज रात्री ७ ते ८ तास झोप घ्या आणि दररोज २ ते ३ लीटर पाणी प्या. - वारंवार सुर्यप्रकाशात जा, हे विशेषत: लहान मुलांसाठी महत्त्वाचं आहे, कारण अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे चष्मा लागण्याची शक्यता कमी झाल्याचं दिसून आलं आहे - मुलांच्या मोबाइल वापरावर लक्ष असू द्या. वरीलप्रमाणे खबरदारी घेतल्यास डोळ्यांची चांगल्याप्रकारे काळजी घेता येऊ शकते. पण, डोळ्यांबाबत कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास त्वरीत डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वत:हून उपचार करू नका, डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानं अयोग्य उपचार आणि डोळ्यांच्या समस्यांना आळा घालण्यास मदत होईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट