लॉकडाउन आणखी वाढल्यामुळे अनेकांच्या मनात चिंतेचे ढग दाटून आलेले असताना मानसोपचारतज्ज्ञ लोकांच्या मदतीला धावून आले आहेत. नकारात्मक परिस्थितीला सामोरं जाताना मनाची स्वच्छता कशी करावी, आव्हानांना कसं तोंड द्यावं याबाबत ते 'नेटा'नं काम करताहेत. मुंबई टाइम्स टीम गेला दीड महिन्याहून अधिक काळ आपण सगळे घरी थांबून आहोत. बाहेरच्या कठीण परिस्थितीमुळे दुकानदार-व्यावसायिक-नोकरदार सगळेच चिंतेत आहेत. हाताशी असलेला वेळ, चिंता, अनेक वर्ष मनात साठवलेले विचार, मतं, भावना यांचा मनामध्ये नुसता कोलाहल झाला आहे. मनात अनेक भावना अन् विचारांचा संघर्ष सुरू आहे. या कठीण काळात आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहता यावं यासाठी मानसोपचारतज्ज्ञ मदतीला धावले आहेत. या रिकामपणात आजवर साठलेल्या अनेक भावनांचा निचरा करता येईल का, अनेक गोष्टींकडे नव्यानं-वेगळ्या दृष्टीनं पाहता येईल का अशा प्रश्नांचं विश्लेषण मानसोपचारतज्ज्ञ 'ब्लॉग', ऑडिओ सीरिजमधून करत आहेत. बाहेरच्या नकारात्मक स्थितीत स्वत:चं संतुलन कसं राखावं, आव्हानांना तोंड देण्याची मानसिक तयारी कशी करावी इथपासून ते मनाची स्वच्छता कशी करता येईल, इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर बोललं जात आहे. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी लॉकडाउनच्या काळात मानसिक संतुलन आणि सुदृढता राखण्याच्या दृष्टीनं 'कळण्याचे आणि करण्याचे दिवस' अशी ऑडिओ मालिका तयार केली. यात त्यांनी, विचार अन् विविध मनोवस्था, त्यांची सकारात्मक दिशा, छोट्या छोट्या कृतीतून साध्य करण्याची सकारात्मकता अशा विविध बाजूंचा ऊहापोह करत सोप्या शब्दांत मानसिक संतुलनाचे धडे दिले आहेत. लॉकडाउनच्या काळात भावनिकदृष्ट्या सकस जगण्याचा प्रयत्न कसा करता येईल, अनिश्चिततेकडे कसं पाहावं, बंधनं आल्यावर काय करायचं यासारख्या बाबी त्यांनी मांडल्या आहेत. या परीक्षेच्या काळात पुढल्या झेपेची तयारी करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. 'आवाहन' या युट्यूब चॅनलवर ऑडिओ आणि व्हिडीओ मालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिल्लीतील 'एम्स'चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही व्हिडीओच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्य जपण्याचा सल्ला दिला आहे. लॉकडाउनच्या रिकामपणात मन सैरभैर होण्याची भीती आहे. भविष्याची काळजी मनाला घेरू शकते. पण, त्यासाठीच मन गुंतवून ठेवणं कसं आवश्यक आहे, हे त्यांनी मांडलं आहे. या काळात पुरेशी झोप घ्या. ध्यानधारणा, योगसाधना करा. निराशा आणि नकारात्मकता दूर ठेवा, असं ते सांगतात. 'माइंड कोच' डॉ. तेजस्विनी कुलकर्णी यांनी 'मनाचा क्वारंटाइन' या मालिकेतून लॉकडाउनचा काळ स्वत:मध्ये डोकावण्यासाठी कसा उपयक्त ठरेल अन् मनावरचं ओझं कसं भिरकावता येईल, याबाबत विश्लेषण केलं आहे. मनाचं डाएटिंग, स्वत:शी मैत्री, नकारात्मकतेचं जोखड भिरकावणं, चांगल्या मानसिक सवयी याबाबत त्यांनी सविस्तर संवाद साधला आहे. घरात बसून येणाऱ्या कंटाळ्यामुळे चिडचिडेपण वाढतं. वाद होऊ लागतात. याच मानसिक स्थितीमध्ये बदल आणण्यासाठी मालिका केल्याचं डॉ. कुलकर्णी सांगतात. त्यांची ऑडिओ मालिका स्नॉवेलवर उपलब्ध आहे. डॉ. नीलेश शहा, डॉ. धनंजय चव्हाण, डॉ. दीपक कोरगावकर, डॉ. लिंडा यासारख्या अनेक डॉक्टर, तज्ज्ञांनीही लॉकडाउन आणि मानसिक आरोग्याचं व्हिडीओद्वारे विश्लेषण केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही मानसिक आरोग्याचं महत्त्व जाणत ते जपण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे. इंटरनेटचा आधार लॉकडाउनच्या काळात मानसिक स्वास्थ्य कसं राखावं, लॉकडाउन आणि मानसिक आरोग्य, अँझायटी, डिप्रेशन, मानसिक आरोग्य यासारख्या मानासिक आरोग्याशी संबंधित गोष्टींबाबत माहिती घेण्यासाठी इंटरनेटचाही आधार घेतला जात आहे. गूगल सर्चच्या माध्यमातून यावरील लेख, ऑडिओ, व्हिडीओ शोधून त्याविषयी जाणून घेतलं जातंय.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट