Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक का?

$
0
0

बदलती आरोग्यशैली

स्त्री-पुरुषांना संसार रथाची दोन चाकं मानली जातात. एक चाक रुग्णावस्थेत राहिलं, तर हा रथ धावणार कसा? त्यामुळे एकूणातील सामाजिक स्वास्थ्यासाठी स्त्रियांमध्ये मानसिक आजारांबाबत जागृती निर्माण करणं, त्यांना योग्य पद्धतीचे समुपदेशन आणि मानसोपचार मिळण्याची आज नितांत गरज आहे.

- डॉ. अविनाश भोंडवे

निसर्गानं स्त्री आणि पुरुषांना एकमेकांपेक्षा वेगळं बनवलं. हे वेगळेपण केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक पातळीवरही असतं, हे सर्वमान्य आहे. स्त्रियांच्या मज्जासंस्थेच्या कार्यामध्ये मानसिक आघात झाल्यावर जी प्रतिक्रिया उमटते, ती पुरुषांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण होण्याचं प्रमाण जास्त असतं, असं आता सप्रयोग सिद्ध केलं गेलं आहे. 'बायॉलॉजिकल सायकियाट्री' या वैद्यकीय मासिकाच्या जुलै २०१९च्या अंकात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. नाओमी आयसेनबर्गर यांनी त्यांच्या संशोधनाच्या गोषवाऱ्यात हे सप्रमाण दाखवून दिलं आहे.

मानवी आयुष्यात दुःखाचे, उदासीनतेचे अनेक प्रसंग येतात. बहुतेकदा त्यांची मनावरची पडछाया काही काळात आपोआप दूर होते. उदासपणाची किंवा दुःखद भावनेची अवस्था कोणत्याही कारणाशिवाय, दीर्घकाळ टिकून राहिली, तर त्याचं रूपांतर नैराश्य किंवा डिप्रेशन या गंभीर मानसिक आजारात होतं. या आजारात त्या व्यक्तीच्या भावना, विचार आणि दैनंदिन व्यवहार पूर्ण विचलित होतात. त्याचं बोलणं, झोपणं, खाणं, पिणं असे नित्य व्यवहार पूर्णपणे बदलतात.

मानसिक आजारांमध्ये सर्वांत जास्त आढळणारं नैराश्य हे येत्या काही वर्षांत जगात सर्वाधिक आढळणारा आणि पुनःपुन्हा उद्भवणारा विकार असेल, असं जागतिक आरोग्य संघटनेचं अनुमान आहे.

जागतिक आकडेवारीनुसार नैराश्याच्या आजाराचं प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांच्या दुपटीनं आढळतं. हार्मोन्सच्या पातळीमधील चढ-उतार, अनुवंशिकता, सामाजिक कुचंबणा आणि वैयक्तिक अनुभव यां बरोबरच स्त्रियांमधील आगळ्यावेगळ्या शरीरक्रिया त्यांच्या नैराश्याचं कारण बनतात. त्यांच्या आयुष्यातील काही विशेष टप्पे त्यांना नैराश्याच्या गर्तेत लोटायला कारणीभूत ठरतात.

पौगंडावस्था : लैंगिक संप्रेरकांमुळे मुलींना मासिक पाळी येते आणि छोट्या बालिकेची किशोरवयीन युवती बनते. या बदलामध्ये त्यांचा स्वभाव थोडा लहरी बनतो. या काळात उद्भवणाऱ्या लैंगिकता, स्वत्वाची जाणीव, पालकांशी वेळप्रसंगी होणारे तीव्र मतभेद, शैक्षणिक क्षेत्रातील कमालीचं स्पर्धात्मक वातावरण यांमुळे त्यांच्या आयुष्यात नैराश्य डोकावण्याचे प्रसंग येऊ लागतात. मासिक पाळी येण्यापूर्वी अनेक मुलींना छातीत-पोटात दुखणं, डोकेदुखी, चिडचिडेपणा येणं असे त्रास दोन-पाच दिवस होतात. याला 'प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम' म्हणतात. काही मुलींमध्ये त्यांच्या लैंगिक संप्रेरकांचा परिणाम मेंदूमधील 'सिरोटोनिन' नावाच्या रासायनिक द्रव्यावर होतो. या सिरोटोनिनमुळे सामान्यतः वागण्यातले मूड सांभाळले जात असतात. साहजिकच या मुली कमालीच्या लहरी बनतात आणि 'प्रीमेन्स्ट्रुअल डिसफोरिक डिसऑर्डर' या आजारानं ग्रासल्या जातात. ही या मुलींमधल्या नैराश्याची पहिली चाहूल असते. मुलींमध्ये पौगंडावस्था थोडी लवकर येत असल्यानं त्यांना नैराश्याचा आजार कमी वयात आणि जास्त प्रमाणात होतो. ही जेंडर गॅप पुढे आयुष्यभर कायम राहते.

गरोदरपणा : या काळात संप्रेरकांचे बदल त्रास देतातच; पण दैनंदिन कामातली दगदग, त्यातील क्षमतेत होणारा बदल, शरीरसंबंधातील समस्या, सामाजिक रूढी यांमुळे मानसिक अवस्था विषण्ण होते. त्यात नको असताना दिवस राहणं, कौटुंबिक दबावानं लादलेली गर्भधारणा, नैसर्गिक गर्भपात, मनाविरुद्ध गर्भपात करायला लावणं, अशा गोष्टी घडल्यास नैराश्य येणं अपेक्षितच असतं. मूल हवं असूनही गर्भधारणा न होणाऱ्या स्त्रियांमधील वंध्यत्व हा नैराश्याचा महत्त्वाचा भाग आज मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

प्रसूती पश्चात : बाळंत झाल्यावर अनेक माता चिडचिड्या बनतात, अचानक खूप गंभीर होतात, रागराग करू लागतात, तर काही सतत रडत राहतात. 'बेबी ब्लूज' नावाने ओळखला जाणारा हा प्रकार एकदोन आठवड्यात दूरही होतो. काही स्त्रियांमध्ये त्याचं रूपांतर नैराश्यात होतं. 'पोस्टपार्टम सायकोसिस किंवा डिप्रेशन' नावानं ओळखला जाणारा हा प्रकार त्यांचं आयुष्य ग्रासून टाकतो.

रजोनिवृत्ती : या काळात तारुण्य सरल्यानं शरीरात होणारे बदल आणि त्याचे मनावर होणारे परिणाम नैराश्याला कारणीभूत ठरतात. वाढतं वजन, शरीरावर उमटणाऱ्या वृद्धत्वाच्या खुणा, झोप न लागणं अशा गोष्टी या काळात घडत जातात. अचानक खूप रडू येणं, तीव्र संताप होणं, सतत चिडचिड होणं, विमनस्क होऊन कुठेतरी दूर निघून जावं, अशा भावना निर्माण होतात. या काळात नैराश्य येण्याचं प्रमाण साहजिकच जास्त असतं.

सामाजिक आणि सांस्कृतिक कारणं : यात स्त्रियांना मिळणारा दुय्यम दर्जा त्यांच्या नैराश्याचं कारण बनतो. लायकी आणि कर्तबगारी असूनही पुरुष धार्जिण्या जगात त्यांना स्पर्धेत मागे ठेवलं जातं. घर-ऑफिस यांमध्ये होणारी दुविधा, स्वतःच्या आवडींना, छंदांना वेळ देता न येणं यामुळे त्या कुचंबून जातात. समाजात अगदी कोवळ्या वयापासून होणारं लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार, लैंगिक दुरुपयोग यांमुळे त्यांचं भावविश्व नष्ट होत राहतं. 'पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर' हा त्रास अशा बहुसंख्य स्त्रियांमध्ये आढळतो. या साऱ्या कारणांनी स्त्रियांमध्ये नैराश्याचे कारण अधिक आहे.

स्त्री-पुरुषांना संसार रथाची दोन चाकं मानली जातात. एक चाक रुग्णावस्थेत राहिलं, तर हा रथ धावणार कसा? त्यामुळे एकूणातील सामाजिक स्वास्थ्यासाठी स्त्रियांमध्ये मानसिक आजारांबाबत जागृती निर्माण करणं, त्यांना योग्य पद्धतीचे समुपदेशन आणि मानसोपचार मिळण्याची आज नितांत गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>