Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

स्तनाच्या कर्करोगाची चिंता

$
0
0

ज्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हा कर्करोग झाला असेल त्यांना इतरांपेक्षा हा रोग होण्याची शक्यता जास्त असते. यासोबतच ज्या महिलांना पहिले मूल उशिरा म्हणजे साधारणत: ३० वर्षांच्या वर वय झाल्यानंतर त्यांना बाकी स्त्रियांपेक्षा स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

डॉ. ऐश्वर्या अंबाडेकर

भारतीय महिलामध्ये स्तनाचा कर्करोग हा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावरचा कर्करोग आहे. मागील काही दशकांपासून भारतीय स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण सतत वाढते आहे. आज स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढून प्रत्येकी दहाव्या शहरी स्त्रीला व प्रत्येकी विसाव्या ग्रामीण स्त्रीला हा आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल आलेला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण, खाण्या-पिण्याच्या सवयी, तणावपूर्ण जीवन, स्पर्धा या सर्व गोष्टींमुळे कर्करोगासारखे रोग जास्त प्रमाणात दिसून येतात. आधुनिक उपचारपद्धतीत अशा आजारांवर नियंत्रण मिळविणे वा पूर्णपणे आजार नाहीसा करणे शक्य झाले असले तरी अशा आजारांचे वेळीच निदान होणे गरजेचे ठरते. यानुषंगाने या रोगाची माहिती करून घेणे आवश्यक ठरते. स्तनाचा कर्करोग महिलांमध्ये जास्त होतो. फार क्वचित पुरुषांना पण स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगाची नक्की कारणे हे सांगता येणे अवघड आहे. स्तनाला इजा किंवा जखम झाल्याने कर्करोग होत नाही किंवा स्तन कर्करोग झालेल्या रुग्णांपासून या रोगाची दुसऱ्याला लागणही होत नाही हे मात्र पक्के. स्त्रीचे वय जसजसे वाढते, तसतसा हा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. उदा. ३५ वर्षांखालील स्त्रियांना हा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते तर ५० वर्षांवरील स्त्रियांमध्ये ही शक्यता जास्त असते.

ज्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हा कर्करोग झाला असेल त्यांना इतरांपेक्षा हा रोग होण्याची शक्यता जास्त असते. या रोगात अनुवांशिकतेचा प्रभाव दिसून येतो. यासोबतच ज्या महिलांना पहिले मूल उशिरा म्हणजे साधारणत: ३० वर्षांच्या वर वय झाल्यानंतर त्यांना बाकी स्त्रियांपेक्षा स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. ज्या स्त्रियांना कमी वयात (१२ वर्षांपेक्षा कमी) मासिक पाळी सुरू होते व वयाच्या उशिरापर्यंत (५५ वर्षांपर्यंत) रजोनिवृत्ती होते, त्यांना स्तनाच्या कर्करोगाची शक्यता जास्त असते. ज्या स्त्रियांनी बराच काळ गर्भानिरोधक औषधे घेतली आहेत, अशांना स्तनाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती असतात?

स्तनात कर्करोगाची सुरुवात होते त्यावेळी अगदी प्राथमिक अवस्थेत काही लक्षणे दिसून येत नाहीत किंवा लक्षातही येत नाहीत. जसजशी कर्करोगाची गाठ तयार होते, तशी खालील लक्षणे दिसू लागतात.

० स्तनात किंवा स्तनाच्या बाजूला व काखेत गाठ येणे

० स्तनाच्या आकारात बदल होणे

० स्तनाग्र आत ओढले जाणे

० स्तनाच्या त्वचेवर सूज येणे (संत्र्याच्या सालीसारखी त्वचा दिसणे)

अशा प्रकारचे असामान्य बदल आढळून आल्यास ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तसेच योग्य ते उपचार लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे. या कर्करोगाचे अचूक निदान प्राथमिक स्थितीत झाले तर विविध उपचार पद्धतीमुळे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. पहिल्या व दुसऱ्या स्तरातील ७० ते ८० टक्के रुग्ण पूर्ण बरे होऊ शकतात तर तिसऱ्या स्तरातील ४० ते ६० टक्के रुग्ण बरे करता येऊ शकतात. पुढच्या भागात आपण स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे, याची चर्चा करूयात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>