Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

पीसीओडी : मुक्तता शक्य

$
0
0

डॉ. ऐश्वर्या अंबाडकर

देविका नुकतीच दहावीच्या परीक्षेला बसली होती. तिचे वजन ७० किलो होते. पाळी आल्यापासून अनियमित होती. कधी बरेच महिने येत नसे. एकदा आली की रक्तस्राव थांबतच नसे. वजन आणखीनच वाढत चालले होते. चेहऱ्यावर मुरम, पुटकुळ्या आल्या होत्या. या सर्वाचा परिणाम म्हणजे ती अतिशय निराश झाली होती.

लहानपणापासून खट्याळ अशी देविका व तिची आई काळजीत पडल्यासारख्या दवाखान्यात आल्यात. आल्या आल्याच काहीशा चिंताग्रस्त आवाजात देविका म्हणाली, 'डॉक्टर, बघा ना माझा चेहरा किती मुरमाळ झालाय. आरशात बघवतसुद्धा नाही. वजनदेखील वाढतच आहे. मानेवर, काखेत, स्तनाखाली त्वचा काळी पडत आहे.' तेवढ्यात तिची आई म्हणाली, 'आणि मुख्य म्हणजे डॉक्टर हिची पाळी आल्यापासूनच व्यवस्थित नाही. पहिल्यांदा मला वाटले होऊन जाईल सहा महिन्यांत नियमित. पण हे अनियमिततेचे चक्र संपतच नाही. बरीच औषधे घेऊन बघितली. पण प्रत्येक वेळा औषध बंद झाली की ये रे माझ्या मागल्या.' एवढे बोलून त्यांनी फाइल्सचा एक मोठा गठ्ठा माझ्यासमोर मांडला.

असा अनुभव आजकाल अनेकांच्या वाट्याला येत असल्याचे बरेचदा बघायला मिळते. देविकाच्या सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या बीजांडग्रंथीचा (ovaries) आकार मोठा होऊन त्यात वेगवेगळ्या आकारांच्या बुडबुड्यांसारख्या गाठी (cysts) बनल्या होत्या. यालाच 'पॉलिसिस्टिक ओव्हेरिजय डिसीज' (पीसीओडी) असे म्हणतात. चयापचयाशी संबंधित असा हा विकार आहे. यामध्ये स्त्रीबीजांड मोठे होण्याबरोबर इतरही चिन्हे दिसतात. पुरुषसुलभ हार्मोन्सचे रक्तातील प्रमाण वाढते. रक्तातील इन्शुलिनची पातळी खूप जास्त होते. इन्शुलिनला शरीरात प्रतिरोध वाढतो. त्यामुळे कर्बोदकांच्या व स्निग्ध पदार्थाच्या चयापचयामध्ये महत्त्वाचे बदल होतात. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे अंतर्गत हार्मोन्सचे असंतुलन. यामुळे मासिक पाळी अनियमित होते.

या विकाराची कारणे अनेक आहेत. जसे जन्मत:च एखाद्या एन्झाइमचा अभाव. आठ ते दहा टक्के केसेसमध्ये हीच तक्रार आजी, आई, मावशी यांच्यातही आढळते. ढोबळमानाने सांगायचे तर आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलपासून स्त्रीसुलभ सेक्स हार्मोन्स (इस्ट्रोजेन प्रोजेस्टरॉन) तयार होतात. या प्रक्रियेमध्ये एका टप्प्यावर पुरुष सुलभ हार्मोन्स (अॅण्ड्रोजेन) तयार होतो. त्यावर एक शरीरातील एन्झाइम प्रक्रिया करून स्त्रीसुलभ हार्मोन्स तयार करतो. हा एन्झाइम शरीरात नसेल किंवा कमी प्रमाणात असेल तर पुरुषसुलभ हार्मोन्सचे प्रमाण वाढते. तसेच मेंदूमधील पिट्युटरी ग्रंथीमधून तयार होणार एलएच हा हार्मोन खूप वाढतो. त्याचाही ओव्हरीवर प्रभाव पडतो. रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण वाढते, पण त्याला प्रतिरोध होतो. त्यामुळे चरबीचे प्रमाण वाढते. वजन वाढत जाते. ओव्हरीमधून स्त्रीबीज तयार होत नाही. प्रोजेस्टरॉन हार्मोन्स कमी होतात. इस्ट्रोजनचे प्रमाण त्या मनाने वाढते. त्यामुळे पाळी लांबणे, अनियमित होणे, खूप रक्तस्राव होणे ही लक्षणे येतात.

या सर्वांमध्ये भर पडते ती ताणतणावाची. यामुळे तयार होणारे स्ट्रेस हार्मोन्ससुद्धा यात भाग घेतात. प्रदूषण, जंक फूड या सर्वांनी हा विकार वाढत जातो. एक दुष्टचक्र तयार होते. याबाबतची तत्कालिक लक्षणे देविकाच्या बाबतीत बघितली. यासोबतच स्त्रीबीजे तयार न झाल्यामुळे वंधत्व, वारंवार होणारे गर्भपात, गर्भाची वाढ नीट न होणे हे परिणामही दिसून येतात. दूरगामी परिणामांमध्ये महत्त्वाचा म्हणजे मधुमेह! त्याशिवाय रक्तवाहिन्या जाड व अरुंद होणे, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच एका हार्मोनचा प्राबल्यामुळे गर्भाशयातील अंत:त्वचा जाड होऊन गर्भाशयांचा कॅन्सर व ओव्हरीचा कॅन्सर याचीही शक्यता असते.

या विकाराचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी महत्त्वाची ठरते. ज्यात ओव्हरीज मोठ्या व सिस्टिक दिसतात. रक्ताच्या तपासणीमध्ये पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हार्मोन्सची तपासणी करता येते. मुलीचे वय, वजन, विकासाची तीव्रता, लग्न झाले आहे का, मुलासाठी प्रयत्न करीत आहे का असे विविध मुद्दे उपचाराकरिता विचारात घेतले जातात. अलीकडच्या काळात होमिओपॅथी यावर अधिक प्रभावी ठरत आहे. याव्यतिरिक्त जीवनशैली बदलण्यावर आम्ही अधिक भर देतो. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातील स्ट्रेस कमी करण्यासाठी रिलॅक्सेशन, मेडिटेशन, व्यायाम, आहार यायोगे वजन व ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या विकाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणे व डॉक्टरांनी सांगितल्यानुसार वेळापत्रक आखून त्याचा अवलंब केल्यास यापासून पूर्णपणे मुक्तता मिळू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>