Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

वीकेंडला व्यायाम करा, फिट राहा

$
0
0

आजच्या जीवनशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे कामाच्या आणि पैशांच्या मागे धावताना जेवण, आराम, झोप आणि व्यायाम अशा आरोग्याला आवश्यक गोष्टींना वेळच शिल्लक राहत नाही. त्यामुळे वीकेंडला हॉटेलमध्ये पोटभर खाणं, कुठेतरी बाहेर फिरायला जाणं, सिनेमा पाहणं आणि मस्त ताणून देऊन या सगळ्या गोष्टींचा राहिलेला बॅकलॉग अॅडजेस्ट करून टाकणं, हा अलिखित नियमच असतो. मग व्यायामाचं काय? तो असा वीकेंडच्या शनिवार-रविवारमध्ये उरकला, तर आपल्या शरीराला नियमित व्यायामाइतका उपयुक्त ठरेल?
नियमित व्यायामामुळे आरोग्य चांगलं राहतं. बैठ्या जीवनशैलीशी निगडित आजार होण्याची आणि अकाली मृत्यूची शक्यता दुरावते. आठवड्याभरात एकूणात अडीच तास व्यायाम केला, तर वजन, रक्तातील कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित राहतात, हृदयविकार, अर्धांगवायूसारखे प्राणघातक आजार होत नाहीत, रक्ताभिसरण तसंच श्वासोच्छ्वास उत्तम रीतीनं होतात आणि एकूणातच तब्येत सुदृढ राहते.
आवड्यातली ही व्यायामाची १५० मिनिटं वीकेंडच्या दोन दिवसांत, प्रत्येकी ७५ मिनिटं खर्च करून भागवल्यास त्याचा उपयोग आरोग्याला तितकाच चांगला होऊ शकतो, असं आता संशोधनानं सिद्ध झालं आहे. फक्त शनिवार-रविवार व्यायाम करणाऱ्या या जमातीला ‘वीकेंड वॉरिअर्स’ म्हटलं जातं. इंग्लंडमधील लाफबरो विद्यापीठातील डॉ. गॅरी ओ’डोनोवन या शास्त्रज्ञानं ४० वर्षांवरील ६४ हजार व्यक्ती आणि इंग्लंड व स्कॉटलंडमध्ये वेगवेगळ्या आजारांसाठी झालेल्या ११ विस्तृत स्वरूपातल्या सर्वेक्षणांचा यासाठी अभ्यास केला. यामध्ये तीन गट होते.
• दररोज नियमितपणे व्यायाम करणारे, फिटनेस फ्रीक्स.
• फक्त वीकेंडलाच घाम गाळणारे, वीकेंड वॉरिअर्स.
• शरीराला बिलकुल कष्ट न देणारे म्हणजेच मुळीसुद्धा व्यायाम न करणारे.
या तिन्ही गटांचा १९९४ ते २००८ या पंधरा वर्षांत केलेल्या संशोधनातून जे निष्कर्ष निघाले, त्याप्रमाणे जे बिलकुल व्यायाम करत नाहीत त्यांना मधुमेह, अर्धांगवायू, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कर्करोग असे दीर्घकाळ टिकणारे आजार होतात. ते अशा आजारांनी कमी वयात मृत्युमुखीही पडू शकतात.
दुसरा महत्वाचा निष्कर्ष म्हणजे जे थोडा बहुत का होईना; पण रोजच्या रोज, न चुकता, नियमितपणे व्यायाम करतात किंवा आठवड्यातले दोनच दिवस का होईना; पण नियमितपणे करत राहतात, त्यांच्यामध्ये अकाली मृत्युमुखी पडण्याची शक्यता ३० टक्क्यांनी कमी होते. म्हणजेच व्यायाम रोज करा किंवा आठवड्यातले दोनच दिवस करा, आरोग्य शाबूत ठेवायला आणि दीर्घायुषी व्हायला दोन्ही सारखेच उपयुक्त आहेत.
या संशोधनातील एक कच्चा दुवा म्हणजे, हे संशोधन केवळ श्वेतवर्णी इंग्लिश आणि स्कॉटिश पुरुषांवरच केलं गेलं. त्यामुळे आफ्रिकन वंशाचे कृष्णवर्णी, चिनी वंशाचे पीतवर्णी आणि आपणा भारतीयांसारखे गहूवर्णी तसंच स्त्रियांबाबत हा निष्कर्ष लागू पडेल का, हा प्रश्न उभा राहतो.
याच संशोधकांपैकी मार्क हॅमर या शास्त्रज्ञानं या संशोधनाबाबत बोलताना म्हटलं, की असा आरोग्यदायी फायदा वीकेंडला केल्या जाणाऱ्या व्यायामापासून व्हायला हवा असेल, तर तो ७५ मिनिटांचा व्यायाम अतिशय जोमदार असायला हवा. या जोमदार पातळीवर पोहोचण्यासाठी सर्वसामान्य मध्यमवयीन स्त्री-पुरुषांनी १२ आठवडे रोज सौम्य असा व्यायाम ३० मिनिटं करायला हवा. हळूहळू त्यातील वेग आणि जोम वाढवून त्याची अत्युच्च पातळी गाठली, की दोन दिवस फक्त व्यायाम केला तरी चालेल.
बदलत्या जीवनशैलीत वीकेंडला मौजमजा आणि पार्ट्या करणं किंवा दिवसभर लोळून घालवण्याऐवजी सव्वा तास तीव्रतेनं व्यायाम केल्यास आरोग्य आणि दीर्घायुष्य दोन्ही लाभू शकेल. पाच दिवसांच्या बैठ्या जीवनशैलीला दोन दिवसांच्या शारीरिक मेहनतीची जोड दिल्यास मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, वजनवाढ या आजच्या जगातील शापांवर उ:शाप नक्कीच मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>