Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

ताणावर ‘स्पा’चा बाण

$
0
0

जन्माला आलेल्या बाळाला तेल मालिश करून, गरम पाण्यानं न्हाऊ घालून त्यांच्या वाढीला चालना आणि स्नायूंना आराम दिला जातो, त्याचप्रमाणे शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी स्पा करून घेण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत. वयोगट किंवा ऋतू कोणताही असो, स्पाच्या माध्यमातून स्वतःचे लाड करून घेणं लोकांना आवडतंय. मानसिक तणावाखाली असलेले स्पाला प्राधान्य देत आहेच, दुसरीकडे फॅशन म्हणूनही स्पा घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते आहे.
नोकरी-व्यवसायातील वाढत्या अपेक्षा, स्पर्धा, कामाचे जास्तीचे तास, फिरतीची नोकरी यामुळे सध्याच्या पिढीला ताणग्रस्त जीवन जगावं लागतं. हा ताण हलका करण्यासाठी आणि त्यात व्यायामासाठी वेळ मिळत नसल्याचं कारण पुढं करत स्पा लोकप्रिय होतो आहे. अरोमा थेरपिस्ट सानिका गाडगीळ यांच्या मते, ज्यांच्या नोकरीचं स्वरूप बैठं तसंच शारीरिक श्रमाचं असतं, त्यांचं स्पा घेण्याचं प्रमाण जास्त आहे. मुख्यतः मान, पाठ, कंबर या अवयवांवर सतत बसून ताण येत असल्यास लोक स्पा घेतात. गरजेनुसार काहीजण महिन्यातून एकदा, तर काहीजण आठवड्याला स्पा घेतात.
सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारी नमिता मासलेकर-पोतनीस म्हणाली, की लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी मी नवऱ्याबरोबर स्पा सेंटरला गेले होते. कामाच्या व्यग्रतेमुळे एरवी जो आराम मिळत नाही, तो आम्ही इथं पुरेपूर अनुभवला.
माहिती, कामाचं स्वरूप यांच्या आधारावर तज्ज्ञांकडून स्पाचा प्रकार आणि त्यासाठीचं साहित्य सुचवलं जातं. त्यासाठी स्टीम बाथ, जॅकुझी, सौना बाथ असे विविध पर्याय आहेत. व्यग्र दिनक्रमातून स्वतःचे लाड करून घेण्यासाठी, मानसिक ताण हलका करण्यासाठी आणि त्या अनुषंगानं त्वचेची काळजी घेण्यासाठी स्पा महत्त्वाचा वाटतो, असं स्पा थेरपी घेणारे सांगतात.
स्पा उगम
स्पा हे कोणत्याही उपचार पद्धतीचं नाव नसून, स्पा हे ठिकाणचं नाव आहे. बेल्जीयममधल्या स्पा या शहरावरून हा शब्द प्रचलित झाला. स्पा हे लॅटिन शब्द ‘सेनस पर अॅक्वम’चं संक्षिप्त रूप आहे. याचा अर्थ आहे पाण्याच्या माध्यमातून स्वास्थ्य. खरं तर, रोमन आणि ग्रीक साम्राज्याच्या काळात युद्धानंतर गरम पाण्याच्या झऱ्यात अंघोळ करून जखमा बऱ्या केल्या जात असत. तेव्हापासूनच पाण्यातल्या उपचारक्षमतेचा अंदाज लोकांना येऊ लागला. सुरुवातीला फक्त युरोप आणि जपानसारख्या आशियाई देशांमध्येच स्पा संस्कृतीचा प्रसार झाला होता. आता मात्र भारतातही त्याचा प्रचार जोमानं होतोय. आपल्याकडे डे स्पा, रिसॉर्ट स्पा, डेस्टिनेशन स्पा, आयुर्वेदिक स्पा, मेडिकल स्पा, क्लब स्पा असे नानाविध प्रकार उपलब्ध झाले आहेत.
नेमका कोणता स्पा करावा?
स्पा असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि स्पा कन्सलटंट डॉ. मनीष पटवर्धन याबाबत सांगतात, स्पामुळे स्नायू बळकट होतात; शिवाय मानसिक तणावातूनही आराम मिळतो. पहिल्यांदा स्पा थेरपी घेणाऱ्यांना मी स्वीडिश मसाज घेण्याचा सल्ला देईन. जे नियमित वर्क आउट करतात त्यांनी डीप टिशू मसाज घ्यायला हरकत नाही. याचबरोबर आयुर्वेदिक मसाज, थाई मसाज, डिटॉक्स असेही प्रकार आहेत. मात्र, प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसारच मसाज थेरपिस्ट प्रकार सुचवतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>