Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

खा आणि मस्त राहा!

$
0
0

वृषाली वझे, आहारतज्ज्ञ

दोस्तांनो, सुट्टीचा हँग ओव्हर उतरला असेल ना? आता कॉलेज सुरु झाल्यावर दणकून अभ्यास करायचा असं मनात ठरवत असाल ना? मग चला त्यासोबत आणखीही एक संकल्प करा. तो म्हणजे सुदृढ राहण्याचा.

दहावी संपून कॉलेजमधे गेल्यावर आपण एकदम फ्री बर्ड होतो. बाकीची स्वप्न पाहताना निरोगी जीवनाचं स्वप्न मात्र राहून जातं. चांगलं, सकस अन्न वेळेवर खाणं, योग्य झोप घेणं... असे सल्ले उठताबसता मिळतात. यातल्या अडचणी आधी पाहू या आणि मग त्यावर मात कशी करायची ते लक्षात घेऊ. तुम्ही कोणत्या शाखेत गेला आहात त्यावर तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा कोणत्या राहतील ते अवलंबून आहे.

कॉलेज सकाळचं असेल तर तुम्हाला घरातून खूप लवकर निघावं लागतं. मग सकाळचा नाश्ता चुकतोच. कॉलेजला टिपिकल मधली सुटी अशी नसते. त्यामुळे जेवणाला शिस्त येत नाही. कॉलेज म्हणजे स्वातंत्र्य असं समीकरण असल्यानं आपण घरातून बहुधा डबाही नेत नाही. मग कँटीन झिंदाबाद. त्यामुळे घरचं खाणं पोटात जात नाही. एक दिवस अचानक चक्कर येते, मुलींना पाळीच्या वेळेस स्राव जास्त होतो, पाळी अनियमित येते, चेहऱ्यावर पिंपल येतात, त्वचेचे आजार सुरु होतात, पोटाचे विकार मागे लागतात, दम लागतो.... एक ना दोन.

मग आपण हौसेने जिम जॉईन करतो. अंडी, प्रोटिनयुक्त आहार किंवा जिममध्ये विकायला असलेल्या प्रोटिनयुक्त फूड सप्लिमेंट पावडर खाण्याचा सल्ला इन्स्ट्रक्टर हमखास देतो. आपणही मसल बिल्डिंगच्या वेडाने झपाटलेले असतो. मग हा जिमवाला आहार सुरू होतो. शरीराच्या पंचनसंस्थेला न झेपणारं प्रोटीन भसाभस शरीरात गेल्याने त्याचा ताण यकृतावर येतो. वजन नको इतक्या वेगाने वाढायला लागतं.

हं... आता या सगळ्यांवर उपाय काय? तो म्हणजे, सकस आहार. तो कसा जमवायचा?

घरातून कितीही लवकर निघावे लागले तरी काहीतरी खाऊन निघा. किमान एक ग्लास दूध पिऊन निघा.

तुमच्या बरोबर खाणं कॅरी करा. पोळीचा लाडू, चिक्की, चणे-दाणे, सुकामेवा असं काहीही असेल. ते काही ओल्ड फॅशन्ड दिसणार नाही. मुख्य म्हणजे दोन लेक्चरच्या मध्ये हे पदार्थ पटकन तोंडात टाकता येतील.

काहीही करा पण जेवणाची वेळ चुकवू नका. साग्रसंगीत जेवायलाही वेळ नसेल तर त्या दिवशी पोळीमधे भाजी घालून त्याचे रोल करून घेऊन जा. ते जेवणाच्या वेळी खा.

कोल्ड ड्रिंकऐवजी फळांचा रस प्या. सारखा चहा पिऊ नका. डोक्यावर ऊन असताना थंड पेय पिणं टाळा.

पाणी भरपूर प्या.

कॉलेजमुळे, लेक्चर-प्रॅक्टिकल्समुळे खाण्याच्या वेळा बदलतात. घरी जायला उशीर होतो. पोटात काही गेले नाही तर दुप्पट त्रास होतो. मग चिप्स, चॉकोलेट जास्त खायचा मोह होतो. याचं अतिसेवन केव्हाही वाईट. यावर उपाय म्हणून ड्रायफ्रुट लाडू, अंजिराच्या चकत्या, तिळाची चिक्की खा. सध्याचा थंडीचा काळ हे सगळं पचवायला उत्तम आहे. पुढे उन्हाळ्यात याऐवजी फळांचे तुकडे सोबत ठेवा. सदासर्वकाळ खाण्यासाठी खाकरे, कुरमुऱ्याचे लाडू सोबत घ्या.

जिममध्ये जाणं चुकीचं मुळीच नाही. तुमचे वजन, उंची यानुसार कोणता व्यायाम करावा हे तज्ज्ञांकडून माहित करून घ्या. मगच व्यायामाला सुरुवात करा. जिममध्ये सुरुवातीला हलके व्यायाम असतात, त्यासाठी भरपूर प्रोटिनवाल्या आहाराची गरज नसते. त्यामुळे हा आहार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या..

कॉलेजच्या बिझी लाईफमध्ये चौरस आहार मिळत नाही. अशा वेळी घरी जेवण घेताना ते चौरस आहार या स्वरूपात घ्या. त्यात भाजी, पोळी, भात, आमटी, सलाड आदी सगळे घटक असू दे.

मित्रांनो, कॉलेज लाईफ एन्जॉय करताना केवळ वर सांगितलेलंच खा असं मुळीच नाही. कॉलेजमध्ये असल्यावर कधीतरी पिझ्झा, बर्गर, चायनिज भेळ खाणारच. कधीतरी गोळा सरबत प्यायलाच पाहिजे, पण हे सगळे तेव्हाच पचेल जेव्हा तुम्ही रोज व्यवस्थित आहार घ्याल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>