त्याचवेळी दुसरीकडे आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी जाहिरातींवर खर्च करण्यास खाजगी कंपन्या मागेपुढे पाहात नाहीत. राजकारणी आणि राज्य व केंद्र सरकारही स्वतःची टिमकी वाजविण्यासाठी जाहिराती करतात. जाहिरातीची व्याख्या एखादी वस्तू अथवा सेवा किंवा घटनेबद्दलची माहिती किंमत घेऊन प्रसारीत करणे अशी करता येईल.
यासंदर्भात आरोग्य क्षेत्राकडे पाहिल्यास ते एक वेगात वाढत असल्याने भरपूर पैसा असलेले क्षेत्र आहे. हे ओळखूनच काही जणांनी आयोग्याचा बाजार मांडलेला आहे. यात उच्चविद्याविभूषित डॉक्टर, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स, बहुराष्ट्रीय औषध कंपन्या, भारतीय आयुर्वेदिक कंपन्या आदींचा त्यात मोठा वावर आहे.
जाहिरातींवर स्वनियंत्रण करणाऱ्या अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्डस् काऊन्सिल ऑफ इंडियाच्या एका वर्षाच्या अनुभवातून आलेल्या काही बाबी म्हणजे, गोरी उजळ कांती, कमनीय बांधा आदींच्या व्यक्तिमत्व आकर्षक करणाऱ्या जाहिरातींना पौढपणीही शैशवात वावरणारे लोक बळी पडतात. त्याला कारण एकत्र कुटुंबाचा ऱ्हास, महानगरातील एकाकीपणा, फॅमिली डॉक्टरवरचा अविश्वास आदी कारणे असू शकते.
एकंदर जाहिरातीच्या २० टक्के जाहिराती आरोग्याशी संबंधित असतात. त्यात उंची वाढविणे, वजन कमी करणे, त्वचा गोरी करणे, डाग घालवणे, टकलावर केस उगवणे, कामोत्तेजक औषधे, मधूमेह, दमा, संधिवात, कॅन्सर, सोरायसीस आदींवरील उपचार, वंध्यत्व, स्मरणशक्ती, व्यसनमुक्ती आदींचा समावेश आहे.
नुकत्याच एका कंपनीने डेग्युच्या तापावर प्लेटलेट्स वाढविण्यासाठीच्या गोळीची जाहिरात करून प्रचंड पैसा कमवला. त्यात आध्यात्मिक गुरू, योगगुरू, बाबा इत्यादीही मागे नाहीत.
भारतात आधुनिक वैद्यक, आयुर्वेद, सिद्ध, युनानी व होमिओपथी या मान्यताप्राप्त उपचारपद्धती आहेत. एकाला झाका व दुसऱ्याला काढा पद्धतीने ते एकाच माळेचे मणी असावेत असे वाटते. शिवाय रेकी, अॅक्युप्रेशर, संमोहन आदी भुरटी मंडळीही जोरदार जाहिराती करतात. काही महाभाग तर स्वतःला संयुक्त उपचार पद्धतीचे प्रॅक्टीशनर संबोधून जगातील यच्छयावत रोगांवर हमखास उपचारांची ग्वाही देतात. यात केवळ आर्थिकच नव्हे तर आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
हे असे का घडते हे पाहिल्यास पहिले कारण अंधश्रद्धा. अगदी सुशिक्षितांमध्येही आरोग्यविषयक अंधश्रद्धा आहेत. दुसरे म्हणजे आर्थिक प्रगतीमुळे अन्य वस्तू आणि सेवांप्रमाणे आरोग्यविषयक वस्तूही वाटतात. तसेच वस्तुस्थिती स्वीकारण्यातील असमर्थता आदींमुळेही असाध्य रोगांबद्दलच्या जाहिरातीला लोक बळी पडतात.
त्यावर काही सूचना कराव्याशा वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे शाळेपासून आरोग्यविषयक शिक्षण द्यावे, आरोग्यविषयक जाहिरातींना दारू, तंबाखू प्रमाणे कडक नियमावली करावी, अन्न व औषध प्रशासनातर्फे कडक कारवाई व्हावी, प्रेस कौन्सिलकडूनही कडक अंमलबजावणी व्हावी, प्रसारमाध्यमांकडून छाननीची कडक पद्धत तज्ज्ञांकरवी अवलंबावी, अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्डस् काऊन्सिल ऑफ इंडियाला कारवाईचे अधिकार द्यावेत. या उपाययोजनांमुळे जनतेचे आरोग्यविषयक हित जपता येईल, अशी आशा आहे. - डॉ. सुहास पिंगळे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट