Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

ऐकावे शरीराचे

$
0
0

दीप्ती आंबेकर, फिटनेस तज्ज्ञ

व्यायाम करताना मनापेक्षा शरीराचं ऐकावं. लहानसहान गोष्टींमुळे व्यायामाला सुट्टी देण्याची गरज नसते, तसंच शरीर तक्रार करत असतानाही व्यायाम करत राहणं चुकीचंच असतं.

सततच्या बदलत्या हवामानामुळे सध्या सर्दी, खोकला, तापानं ग्रस्त झालेल्यांचं प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत व्यायामाला सुरुवात करावी की नाही, अशी अनेकांची द्विधा मनःस्थिती झाली आहे. ज्यांचा व्यायाम सुरू आहे, त्यांच्या व्यायामातही अनिश्चितता दिसते आहे. तब्येत बरी नसताना व्यायाम करावा की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातही काही लोक चार शिंका आल्या, तरी लगेच व्यायाम बंद करतात. याचंच दुसरं टोक म्हणजे काही लोक कितीही आजारी असले, तरी व्यायाम अजिबात चुकवत नाहीत. थोडक्यात आजारी असताना चालायला जायचं की नाही, एरोबिक्स क्लास करावा की नाही, असा प्रश्न आपल्याला पडतो.

अशा वेळेला खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात

आपल्याला झालेला आजार हा किरकोळ असेल म्हणजे थोडी सर्दी आहे; पण श्वास घ्यायला त्रास होत नाही, अशा वेळेस व्यायाम करायला हरकत नाही. फक्त तो नेहमीपेक्षा कमी वेळ तसंच कमी तीव्रतेनं करावा. उदा. नेहमी एक तास जॉगिंग करत असाल, तर त्या ऐवजी अर्धा तास चालावं.

जेव्हा सर्दीबरोबरच श्वास घ्यायलाही त्रास होत असेल किंवा छातीत कफ झाला असेल, तर एखाद-दुसरा दिवस व्यायाम बंद ठेवणं योग्य ठरेल.

अशक्तपणा तसंच अंगदुखी जाणवत असताना व्यायाम बंद ठेवणंच योग्य असतं.

ताप असताना व्यायाम करू नये. आधीच आपल्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं आणि त्यात व्यायामामुळे अधिक ऊर्जा निर्माण होऊन शरीराचं तापमान अधिकच वाढेल. ते तब्येतीच्या दृष्टीने योग्य नाही.

व्यायाम नव्यानंच सुरू केला असेल किंवा बऱ्याच दिवसांच्या सुट्टीनंतर सुरुवात केली असेल, तरीही आपल्याला अंगदुखी जाणवते. हातापायाचे स्नायू दुखतात. जिने चढणं-उतरणंही त्रासदायक होतं. अशावेळेस व्यायाम पूर्णपणे बंद न ठेवता कमी तीव्रतेनं सुरू ठेवावा. व्यायाम झाल्यावर स्ट्रेचिंग करावं. एक दोन दिवसांतच अंगदुखी बंद होईल.

काही वेळेला अति व्यायामामुळे स्नायू दुखावले जातात. अशा वेळेला स्नायूंना आराम देणं अतिशय महत्त्वाचं आहे.

आपल्या स्नायूंना किंवा हाडांना तीव्र दुखापत झालेली असल्यास डॉक्टरांचा सल्ल्यानं योग्य उपचारानंतरच व्यायामास सुरुवात करावी.

काहींचा असाही समज असतो की तीन-चार दिवस व्यायाम बंद पडला, तर आत्तापर्यंतच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडेल आणि परत शून्यातून सुरुवात करावी लागेल. हा गैरसमज आहे. इतक्या वर्षांच्या मेहनीतनं कमावलेल्या तब्येतीवर केवळ तीन-चार दिवसांनी काही फरक पडत नाही. छोट्या छोट्या कारणांमुळे व्यायामाला सुट्टी देण्याचीही गरज नाही. अशा वेळेला आपण मनाचं ऐकण्यापेक्षा प्रत्येकानं आपली शारीरिक तयारी आणि क्षमता तपासावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>