Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

अशी घ्या थायरॉइडच्या आजारांपासून काळजी

$
0
0

डॉ. श्रीकांत अंबाडेकर, आजारतज्ज्ञ

आजकाल थायरॉइडच्या आजाराची जणू साथच पसरलेली आहे. दवाखान्यात येणाऱ्या चार-पाचपैकी एक पेशंट थायरॉइडची काही ना काही लक्षणे घेऊन येतात. यामधील जास्तीत जास्त रुग्ण हायपोथायरॉइडचे लक्षण घेऊन येतात. काही हायपरथायरॉइड म्हणजे थायरॉइडची कार्यक्षमता सामान्यपेक्षा वाढलेली घेऊन येतात. काही थायरॉइडवर सूज 'हाशीमोटो थायरॉइड'ची लक्षणे घेऊन येतात. हा आजार स्त्रियांमध्ये अधिक पाहायला मिळतो. रुग्णांना अनेक प्रश्न भेडसावतात. सर्वात सामान्य प्रश्न म्हणजे, 'मला थायरॉइड असताना मी गर्भधारणा करायला हवी काय?' याचे योग्य उत्तर म्हणजे, 'योग्य औषधउपचार करत असाल तर काहीच हरकत नाही!' परंतु ही स्थिती प्रसूतितज्ज्ञांना सांगायला हवी. गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांत गर्भाच्या मेंदूचा विकास तुमच्या थॉयराइडच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो. याचमुळे तुमच्या डॉक्टरांचे मत महत्त्वाचे ठरते. परंतु, आदर्शरित्या गर्भधारणा पाच-सहा महिने पुढे ढकलली व यादरम्यान औषधांव्यतिरिक्त थायरॉइडला मदत केली तर निश्चितच गर्भाचा विकास अजून व्यस्थित होईल.

थायरॉइडला अशी करा मदत-

० नियमित औषधी घ्यावी. डॉक्टरने सांगितल्याशिवाय औषध बंद किंवा पॉवर कमी करू नये.

० नियमित तपासणी करावी. थायरॉइड हार्मोन्सच्या व्यतिरिक्त कोलेस्टेरॉल, साखरची रक्ताची चाचणी करावी.

० एक योग्य आहार थायरॉइडच्या कार्यक्षमतेला अनेक पट वाढवितो. सेलेनियम, झिंक, मॅग्नेशिअम, जीवनसत्त्वयुक्त पोषक आहार घ्यावा.

० हार्मोनल आजार वाढण्यामागे किचनमध्ये वाढत्या प्लास्टिकचा प्रयोग हासुद्धा आहे. प्लास्टिकमध्ये अन्न साठविणे; विशेषत: मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिक भांड्यांत गरम करणे शरीरासाठी घातक ठरते. प्लास्टिकऐवजी काचेचे भांडे वापरावे. पाण्यासाठी प्लास्टिकऐवजी स्टीलची बॉटल वापरावी. टेफलॉनलासुद्धा टाळावे.

० आहारामध्ये तीन 'पी' टाळायला हवे. प्रोसेस्ड्, पॅक्ड व प्रीझर्व्हड्‌.

० फास्टफूडपासून फास्ट दूर पळावे. आपल्या आतड्यातील पेशींना इजा पोहचोवून हे अन्न आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती विचलित करते. याला 'लिकी गट' असे म्हणतात. याचमुळे ऑटोइम्युन थायरॉइडचे आजार होण्यास सुरुवात होते.

० थायरॉइडची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे जीवनसत्त्व 'ड'ची कमतरता या रुग्णांना सामान्यत: जाणवते. म्हणूनच सकाळी सूर्यप्रकाशात व्यायाम करावा. या जीवनसत्त्वाची रक्तातील तपासणी व गरज भासल्यास सप्लिमेण्ट महत्त्वाचे ठरते.

० कुठल्या कारणासाठी जेव्हा अॅण्टिबायोटिक्स औषधी घ्याल, तेव्हा डॉक्टरांना प्रोबॉयोटिक्स मागायचे विसरू नये.

० कुणाला जेवण करा, हे सांगायची गरज नसते त्याचप्रमाणे व्यायाम करा हे सांगायला नको. सायकलिंग व पोहणे चांगले 'कार्डिओ'चे काम करतात. यामुळे तुमचे वजन जास्त असेल तरी गुडघ्यावर, घोट्यावर व कमरेवर ताण पडणार नाही.

० नियमित योगा थायरॉइडच्या रुग्णाकरिता महत्त्वाचा ठरतो. स्नायूची क्षमता वाढविणे, छोटे-मोठे मसल पेन कमी करणे हे यांनी साध्य होते. सर्वांगासन, हलासन, भुजंगासन हे थायरॉइडकरिता उपयुक्त ठरते.

० पुरेशी झोप व रात्रीची झोप थायरॉइडच्या कार्याला सुरळीत करते.

० ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन करायला हवे. 'टेन्शन मत लो', असे म्हणणार नाही. परंतु ते आल्यावर त्याचे योग्य व्यवस्थापन करावे. आपले छंद जोपासावे, मैत्री वाढवावी. छोटा ब्रेक घ्यावा. मुलासोबत खेळावे. जुने फोटो अल्बम बघावे. जुन्या मित्रांशी गप्पा माराव्या. संगीत ऐकावे.

० थोडा वेळ स्वत:साठी काढावा. सतत करिअर, कुटुंब, मिटिंग, पैसा, मोबाइल या व्यापातून एका व्यक्तीसाठी थोडा वेळ काढावा. तुमच्या वेळेची त्या व्यक्तीला गरज आहे. ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वत:च.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>