क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट
सतत डाएट, कॅलरी चार्ट, व्यायामाचं वेळापत्रक पाळून दमलेल्या शरीराचे थोडेसे लाड तर करायला हवेतच. त्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळही काढायला हवा.
वजन कमी करणं ही शरीरासोबतच मनाचीही लढाई असते. ते करताना शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आपण खाण्या-पिण्याची पथ्यं पाळतो पण मनाचं काय? त्याला उत्साह येण्यासाठी आपण काय करतो? ताण असलेलं मन म्हणजे एक संकटच. आपण अनेकदा या ताणावर खाणं हा उपाय शोधतो. मग वजन कमी करणं बाजूलाच राहतं. असं होऊ नये यासाठी मनावरचा ताण नाहीसा व्हायला हवा. म्हणूनच स्वतःचे थोडे लाड करा.
स्पा घ्या
स्पा म्हटल्यावर आठवतं, शांत वातावरण, मंद संगीत एक खूप छान रिलॅक्सिंग अनुभूती, हलकासा मसाज आणि आपल्या सर्व काळज्या दूर पळवून लावण्याची शक्ती. सतत डाएट आणि कॅलरी चार्ट पाहून कंटाळलेल्या तुमच्या शरीराला असा एक बदल हवाच. स्पामध्ये अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट दिलेल्या असतात.
मसाज केल्याने मनातल्या काळज्या, दडपणाची, मानसिक ताणाची लक्षण कमी होतात. आपल्या नसांना आणि स्नायूंना मसाजामुळे छान आराम मिळतो. ते मोकळे होतात आणि शांत झोप लागते. अॅक्युप्रेशरचं ज्ञान वापरून शरीराच्या विशिष्ट भागांवर दाब देण्यात येतो. यात हात, पाय आणि कानावर काही केंद्र असतात. त्या ठिकाणी योग्य पद्धतीने दाब दिल्यावर आपल्याला खूप आराम वाटतो. तसंच रक्तप्रवाह सुरळीत होतो. ताण निघून जातो. अंतिमतः खूप मोकळं वाटतं. हायड्रोथेरपीमध्ये पाण्याचा वापर करून शरीराला आराम दिला जातो. कोमट पाण्याच्या टबामध्ये ही थेरपी दिली जाते.
झोप काढा
सगळ्या ताणांना, काळज्यांना बाय बाय करायचं असेल तर एक सोप्पा उपाय करा. मस्त ताणून द्या. घराच्या एका निवांत कोपऱ्यात छानसं मऊसर, आरामदायी अंथरुण पाहून बिनधास्त पाय पसरा. पण काहीजणांना मुळी झोपच लागत नाही. ती लागत नसेल तरीही काही गोष्टी तुम्हाला करता येतील.
झोपण्याच्या आधी फार व्यायाम करू नका. व्यायामामुळे शरीरात खूप उत्साह येतो. मग झोप लागणं जरा कठीण होतं. मानसिक संघर्षाची कामं किंवा कोणतीही कठीण कामं करत असाल तर झोपायच्या आधी ती जरा कमी करा. सतत बाथरुमला जायला लागून तुमची झोप बिघडतेय का? मग रात्री आठनंतर द्रवपदार्थ थोडे कमी प्रमाणात घ्या. अर्थात त्याआधी तुमचा दिवसभराचा पाणी पिण्याचा कोटा पूर्ण करून घ्या. काही झालं तरी पाणी कमी पिणं, उपयोगाचं नाही. जेव्हा तुम्ही दमला असाल तेव्हाच झोपायला जा. शरीराला अती थकवा येण्याची वाट पाहू नका. नाहीतर झोप लागणार नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट